अखेर ठरलं...! जागेची पाहणीदेखील झाली.. वाघाळवाडी गावाने दिली १० एकर जागा : सोमेश्वरनगर येथील ६५ कोटींच्या सुसज्ज १०० बेडच्या हॉस्पिटलचा लवकरच शुभारंभ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
गतिमान कार्यशैलीने प्रशासकीय चक्रे फिरवली अन अवघ्या दोनच दिवसात ‘१०० बेडचे हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी देण्याची किमया राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याने सोमेश्वरनगर परिसरातील आरोग्य सुविधेची पोकळी भरून निघाली आहे..!
        सोमेश्वरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी या भागात ‘१०० बेडचे’ हॉस्पिटल करण्याचे जाहीर केले. रात्रीत फोन फिरवत सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्याशी संपर्क करून जागेची उपलब्धता होत असल्याचे समजल्यावर गतिमान कार्यशैलीने प्रशासकीय चक्रे फिरवली अन अवघ्या दोनच दिवसात शासन निर्णय काढून दिलेला शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केला. फक्त त्यास मंजुरी न देता ७७.७९ कोटी रु इतक्या निधीची तरदूत करून त्यास हॉस्पिटल स्थापनेस प्रशासकीय मान्यता देत १५ मार्च २०२४ रोजी मंजुरी दिली आहे.
       बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या करिता आरोग्य सुविधेच्या दृष्टीने शासकीय दवाखान्याची गरज होती. त्या करिता महत्वपूर्ण निर्णय घेत लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी वाघळवाडी येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या संस्थेच्या अधिनिस्त ‘१०० खाटांचे आरोग्य पथक’ मौजे सोमेश्वरनगर -वाघळवाडी ता.बारामती,जि.पुणे यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून  मंजुरी मिळाली. यासाठी ६४.४८ कोटी इतक्या बांधकाम करण्याकामी अंदाजपत्रकीय रक्कमेस १ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
        या १०० बेडच्या हॉस्पिटल करिता जागेची आवश्यकता होती.वाघळवाडीतील ग्रामस्थांनी हे हॉस्पिटल गावच्या परिसरात व्हावे म्हणून दोनशेहून अधिक सह्यांच्या अर्जाद्वारे सरकारी गायरान मधील जागा देणेबाबत ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेची मागणी केली होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत गायरान मधील दहा एकर जागा हॉस्पिटल करिता देण्याचा हात उंचावत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
    हॉस्पिटल करिता आवश्यक असलेली मुबलक जागा वाघळवाडी येथे उपलब्ध असून या ठिकाणी हॉस्पिटल झाल्यास परिसरातील सर्व गावांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वांना आरोग्य सुविधा मिळणेकामी सोईचे होईल याबाबतची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी आणि ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन  दिली आणि या ठिकाणी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी केली होती. 
      यावेळी अजित पवार यांनी तत्काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना जागेची पहाणी करण्याच्या संबधी सूचना केली होती.
  अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ,प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे,वैद्यकीय अधिक्षक अमोल शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रामसेवक मुखेकर,शाखा अभियंता विशाल पाटील यांच्या पथकाने जागेच्या ठिकाणी समक्ष येऊन पहाणी केली.दरम्यान इमारती च्या बांधकामा करिता जागेची उपलब्धता,पाणी व्यवस्था,रस्ता,वीज,रुग्णांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या मार्गाची सोय याची सखोल माहिती घेऊन भविष्यात या ठिकाणी आणखी नवीन आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असे प्रकल्प उभारणी करता येऊ शकतात याची भौगोलिक माहिती घेऊन या ठिकाणी हॉस्पिटल करण्याबाबतचे निकष पूर्ण होत आहेत या करिता सर्वक्षक माहिती जाणून घेतली. या सर्व माहितीच्या आधारावर वाघळवाडीतील निरा-बारामती रस्त्यापासून आठशे मीटर अंतरावर अक्षय गार्डन ते मळशी रोड लगत असलेली सरकारी गायरान जागा ‘१०० बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी’ सर्व निकषानुसार योग्य असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या पथकाने दिल्याने या जागेत हॉस्पिटल उभारणी करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्याने हॉस्पिटल उभारणी’चा मार्ग आता मोकळा झाला आहे.
    या हॉस्पिटल मुळे बारामतीच्या पश्चिम भागातील गावांच्या नागरिकांची आरोग्य सुविधेची असलेली पोकळी भरून निघणार असून पुरंदर, फलटण, खंडाळा या तालुक्यातील काही गावांना याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी हॉस्पिटल इमारत, हॉस्टेल इमारत, निवासी इमारत, पार्किंग, गार्डन, रस्ते आदि कामे होणार आहेत.
हॉस्पिटलची उभारणी वाघळवाडी येथील सर्व सुविधायुक्त उपलब्ध असलेल्या जागेत होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटलच्या जागेच्या स्थळपहाणी दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे,सरपंच अँड. हेमंत गायकवाड, उपसरपंच गणेश जाधव, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, नवी मुंबई राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय सावंत, सदस्य जितेंद्र सकुंडे, तुषार सकुंडे, अनिल शिंदे, अँड.अनंत सकुंडे, अजय सावंत, रामचंद्र गायकवाड, गणेश शिंदे आदी ग्रामस्थांनी याकामी प्रयत्न व  पाठपुरावा केला.    --------------------------------  
    अजितदादांनी हॉस्पिटल बाबतची वाघळवाडी आणि सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांची असलेली मागणी पूर्ण केली.काटेवाडी इतकंच वाघळवाडी’वर प्रेम दादांनी विकास कामांच्या माध्यमातून केल आहे .या मोठ्या हॉस्पिटलच्या वास्तूमुळे गावच्या वैभवात भर पडेल.दादांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आभार!
-सरपंच,अँड.हेमंत गायकवाड
To Top