सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
घरामधील गँस सिलेंडरची गळती होऊन सिलेंडरच्या स्फोटात लागलेल्या आगीत शेजारी शेजारील दोन घरे आगीत भस्मसात झाली.यामध्ये दोन्ही घरामधील साहित्यासह सुमारे दहालाखाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा महसुल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
दिडघर ता.भोर येथील यमुना रघुनाथ बांदल व दिनेश काशिनाथ बांदल यांची एकाच वाड्यात असलेली शेजारी -शेजीरची दोन घरे या आगीत जळाली.ग्रामस्थांसह दोन अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु लाकडी तुळई व कौलारु असलेली ही घरे पुर्ण जळुन खाक झाली.
मंगळवार दि.२ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका घरातील गँस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला व घराचे छप्पर जळु लागल्याचे परिसरातील नागरीकांच्या लक्षात आले. यावेळी एका घरातील यमुनाबाई या शेतात गेल्या होत्या.तर दिनेश बांदल हे त्यांच्या नविन बांधलेल्या घरामध्ये होते. त्यांना तातडीने बोलावण्यात येऊन ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला.याचवेळी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बांदल यांनी पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्रास तसेच भोर नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रास फोन करुन माहीती दिली ल.काही वेळाने पीएमआरडीए च्या अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांच्या सहाय्याने ग्रामस्थांनी सुमारे तीन तासांनी आग आटोक्यात आणली.आग एवढी मोठी होती की परिसरातील कौलारु लाकडी घरांना देखिल आगीची धग लागत होती.आगीमध्ये घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. घरातील साठवले गहू, तांदळाचे कट्टे, कडधान्य,घर प्रपंचातील इतर सर्व साहित्य, घराचे छप्पर, सागवान लाकूड, लोखंडी बॅटम ,कपडेलत्ते रोकड व साडेपाच तोळे सोने आणि घर असे मिळून जवळपास दहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
घटनास्थळी नसरापूरचे महसुल मंडलाधिकारी प्रदिप जावळे,ग्राममहसूल अधिकारी सचिन ढोरे,ग्रामपंचायत अधिकारी सरला नलावडे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.महसुल अधिकारी ढोरे यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला यावेळी पोलिस पाटील निता सोंडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
