Baramati News l गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली 'अंकिता' शाळेत आली पहिली : पण निकालाचा आनंद साजरा करायला 'अंकिता' या जगात नाही

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे. तिला ७८.४० टक्के गुण मिळाले आहेत. 
              एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती
 काल अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत. उर्वरीत आरोपींना अटक व कठोर कारवाई हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असे तिच्या पालकांनी सांगितले. 
------------------------
१५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती. ७ एप्रिल २०२५ ला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. 
To Top