Malegaon Sugar Factory l निवडणुकीच्या तोंडावर 'माळेगाव'च्या सभासदांना खुशखबर..! कांडे बिलापोटी टनाला २०० रुपये मिळणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपायांप्रमाणे कांडे बिल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कारखान्याने तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच ही रक्कम सभासदांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच कांडे बिलाची घोषणा करत संचालक मंडळाने सभासदांना सरप्राईज दिल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. 
               माळेगाव कारखान्याच्या काल झालेल्या संचालक मंडळ बैठकीत कांडे बिलावर चर्चा करण्यात आली. २०० रुपयांप्रमाणे बिल अदा करण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. पैशांची उपलब्धता होताच ही रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली जाईल अशी माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली. संचालक मंडळाने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सभासदांना दिलासा मिळाला आहे.         
माळेगाव कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३१३२ रुपये दर दिला आहे. सुरुवातीला २८०० रुपये पहिला हप्ता आणि नंतर ३३२ रुपये दूसरा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता प्रतिटन २०० रुपये कांडेबिल जाहीर करत कारखान्याने सभासदांना दिलासा दिला आहे. त्यामुळं सभासदांना प्रतिटन ३३३२ रुपये दर मिळणार आहे. 
दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीची घोषणा काही दिवसांत होणे अपेक्षित आहे. अशातच संचालक मंडळाने कांडे बिलासाठी २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेऊन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिल्याची चर्चा कार्यक्षेत्रात रंगली आहे.
To Top