सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यशासन, जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, निवडणूक प्राधिकरण तसेच पोलीस खाते यांच्या परवानगीने या ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते. जर ही सभा कोणाला बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी न्यायालायत जावे असे परखड मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
आज सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक विशाल गायकवाड व लालासाहेब नलावडे उपस्थित होते. काल शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सोमेश्वर ची ऑनलाइन सभा ही बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता त्यांच्या आरोपांचे खंडन करताना जगताप बोलत होते. ते पुढे म्हणाले वास्तविक विस्तारवाढीला सन २०१८ च्याच सर्वसाधारण सभेत मंजूर देण्यात आली होती. या ऑनलाइन सभेत फक्त वाढीव खर्चाला सभासदांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर आहे अथवा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही असं जर कोणाला वाटत असेल त्यांची कुठली तक्रार असेल तर त्यांनी न्यायालायत जावे अन्यथा लवकरच सोमेश्वर कारखान्याची निवडणूक सुरू होत आहे त्यांनी जनतेच्या दरबारात जावे. असे सांगत संचालक मंडळाने जर काही गैर केले असेल तर शेतकरी कृती समितीने निवडणूक रिंगणात उतरून सभासदांचा कौल मागावा. कालच्या ऑनलाइन सभेत ३७ टक्के सभासदांनी सहभाग घेतला असून १२७ सभासदांनी प्रत्येक्ष सहभाग घेतला होता. कोविडमुळे निवडणुका लांबल्यामुळे नवीन संचालक मंडळ येइपर्यंत या संचालक मंडळाला काम करायचे आहे. याबाबत शासनाने या संचालक मंडळाला निर्णय घेण्याचे अधिकारी दिले आहेत.
दुसरी बाब म्हणजे आता १० हजार सभासद होण्यासाठी लोक प्रतीक्षेत असून २७ हजार सभासदांचाच उसाचे गाळप करण्यासाठी करखान्याला मे महिना उजडणार आहे. अजून सभासद वाढवले तर त्यांच्या ऊस गाळपाची जबाबदारी कारखान्यावर येईल. सभासद करून घेताना आपण तो कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्याला सभासद करून घेतले आहे.
संचालक मंडळ स्वार्थीच आहे
चालू हंगामात गोरगरीब सभासदांचा उसाचे नुकसान होत आहे. दुर्दैव आहे की इतर कार्यक्षेत्रातील कारखाने सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात येऊन ऊस घेऊन जात आहेत. कोणी कुठल्याही भावाने ऊस देत आहे. सभासदांचे नुकसान होऊ नये हाच आमचा स्वार्थ आहे. असे अध्यक्ष जगताप यांनी स्पष्ट केले.
पुरंदर उपसा सिंचन योजनेला कारखाना बळ देणार
पुरंदर उपसा सिंचन योजना ही सोमेश्वर कारखाना चालवण्यास घेणार असुन याबाबतची प्रकिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पाणी वितरण, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी वसुली यासर्व बाबी कारखाना पातळीवर पहिल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला आता वेळेवर पाणी मिळणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
पुरुषोत्तम जगताप यांचे सतीश काकडे यांना
खुल्ले आवाहन
आखाड्यात उतरायचं पण कुस्ती करायची नाही मंग काय करायचं..मातीत तोंड खुपसून फक्त पालत पडून राहायचं .... अशी कृती समितीची गत आहे असा टोला लागाऊन काही मुठभर लोकांच्या सांगण्यावरून सभासदांनी गोंधळून जाऊ नये सोमेश्वर कारखान्याचा विकास व प्रगती पाहवत नाही. कृती समितीकडे उमेदवार नाहीत त्यांनी हिंमत असेल तर निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे असे जगताप यांनी थेट काकडे यांना आवाहन दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार-----
सोमेश्वर कारखान्यासमोर चालु गाळप हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न समोर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार कार्यक्षेत्रातील कारखान्याचे परीपत्रक डावलून नियमबाह्य बिगरनोंदीचा जो ऊस होता असा तब्बल ३० हजार मे.टन ऊस दौंड शुगर साखर कारखान्याने गाळपास नेला. याबद्दल अजितदादा पवार यांचे संचालक मंडळाच्या वतीने मी आभार मानतो असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले.