सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील आशा शिवाजीराव खलाटे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०१९ जाहीर झाला आहे. मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी आशा खलाटे यांचे पती शिवाजीराव खलाटे यांना २०१६ साली राज्य शासनाचा कृषीनिष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आशा खलाटे हया वाणेवाडी (मळशी) येथील संपतराव जगताप यांच्या कन्या. कांबळेश्वर येथील शिवाजीराव खलाटे यांच्याशी लग्न झाल्यानंतर ७ एकर जमीन वाटून आलेली आहे. आशा खलाटे यांना वडिलांपासूनच शेतीचं बाळकडू मिळालेले. शेतीत आवड असल्याने त्यांनी उत्तम शेती करण्याचा निर्णय घेतला. सद्या आशा खलाटे ह्या ७ एकर
क्षेत्रापैकी २ एकत्र क्षेत्रावर २०१३ पासून पॉलिहाऊस केले आहे. यामध्ये कलर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. कंपनीचे १० गुंठ्यांत १० टनाचे उत्पन्न असताना सौ खलाटे या १० गुंठ्यात १५ टनाचे उत्पादन घेत आहेत. याव्यतिरिक्त इतर पाच एकरात हायपिंक पेरू घेतला असून एका पेरूचे वजन एक किलो आहे. तसेच टोमॅटो, झेंडू आणि वांगी अशीदेखील पिके घेतली जात आहेत.
पालघर पॅटर्न.......
उत्तम शेती करत असताना तेवढेच उत्पन्न मात्र खर्च कमी म्हणून सौ खलाटे यांनी पालघर पॅटर्न आवलंबण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वी ही करून दाखवला. गेली सात वर्षापासून शेडनेट टाकून एक एकरात ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. याबरोबरच टोमॅटो देखील शेडनेट टाकूनच केली जातात.
तसेच पूर्ण भाजीपाला शेतीची रोपे ही ग्राफ्टिंग करून लावली जातात.
१० वर्षात पहिल्यांदा ऊस-------
कांबळेश्वर हे निरा खोऱ्यात बागायती पट्यातल गाव. याभागातील शेतकऱ्यांचा उसाच्या पिकाकडे जादा ओढा असताना खलाटे यांनी मात्र ' उसाचे पीक नकोच' अशी भूमिका ठेवली आहे. पिकाची अलटी पलटी होण्यासाठी खलाटे यांनी वर्षात पहिल्यांदा दीड एकर उसाचे पीक घेतले आहे. पती शिवाजीराव, थोरला मुलगा गणेश, धाकला शरद तसेच सून रेश्मा आणि पल्लवी या शेतीत मदत करत असल्याचे आशा खलाटे यांनी सांगितले.