सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया शुगर १ मार्च ते ३१ मार्च अखेर तुटून आलेल्या उसाचे बिल मंगळवार दि २० रोजी ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी दिली.
साखरवाडी(ता. फलटण) येथील श्री दत्त इंडिया शुगरने मार्च महिन्यात गाळपास गेलेल्या उसाचे बील महिना होऊनही जमा केले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याबाबत काल 'सोमेश्वर रिपोर्टर' ने साखरवाडी करखान्याचा ऊस उत्पादक सभासदांना ठेंगा या मथळ्याखाली बातमी छापली होती.
१ ते १५ मार्च आणि १६ मार्च ते ३१ मार्च या दरम्यान गेलेल्या ऊसाचे पेमेंट अद्यापही मिळाले नाही. याबाबत कारखान्याने तातडीने पावले उचलत १ मार्च ते १५ मार्च आणि १६ मार्च ते ३१ मार्च या दोन पंधरावड्याचे ४५ हजार टनाचे ७ कोटी ५० लाख रुपये मंगळवारी सभासदांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.