सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
नाभिक समाजाचे वीररत्न शिवा काशीद यांच्या समाधी स्थळासाठी ५० लाखाचा निधी उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
बारामती तालुक्यातील पणदरे येथे बहुजन समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाभिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील बहुजनांवर अन्याय करण्याची धोरणे राज्यसरकार राबवित आहे. त्यामुळे ही धोरणे मोडीत काढण्यासाठी बहुजनांनी संघटीत होण्याची गरज असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
यावेळी नाभिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नाभिक समाजाची लाॅकडाऊनच्या काळात दूकाने बंद होती. त्यामुळे नाभिक समाजाची अवस्था बिकट झाली आहे. या समाजात काम करावे तेव्हा पोट भरते. मात्र असे असताना शासनाकडून अद्याप कसलीच मदत मिळाली नाही. त्यामुळे नाभिक समाजाला आर्थीक मदत मिळावी. तसेच प्रतापगडावर शिवरक्षक जिवा महाले यांचा पुतळा बसविण्यात यावा. तसेच ओबीसी ची स्वतंञ जणगणना करावी आदी मागण्यात निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी पडळकर म्हणाले की शिवा काशिद स्मारकासाठी माझ्या फंडातुन २५ तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातुन २५ मिळुन ५० लाखाचा निधी वर्ग झालेला आहे. तसेच शिवा काशिद आणि महाराजांचे गुप्तहेर बहिरजी नाईक या दोघांच्या स्मारकासाठी सुमारे ३ कोटी ५० लाखाचा निधी भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातुन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. त्यामुळे येत्या वर्ष भरात ही दोन्ही स्मारकांची कामे मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिवा महालेंचे स्मारक प्रतापगडावर व्हावे अशी भुमिका भाजपची असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष दिलीप जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती कर्वे, बारामती तालुका अध्यक्ष महेश काशिद आणि बीडचे महादेव राऊत आदींसह बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.