सुदाम नेवसे
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
'चांडाळ चौकडीच्या करामती' या वेब सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपल्या डॉयलॉग मधून प्रसिद्ध असलेले आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे, पथनाट्य, किर्तनाच्या माध्यमातून समाजिक प्रबोधन करणारे हभप भरत पांडुरंग शिंदे उर्फ बाळासाहेब यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
तब्बल दोन तपाहून अधिक काळ रंगमंच गाजवत अस्सल ग्रामीण भाषा शैलीत बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावचे कला पथक मनोरंजनातून प्रबोधन करीत आहे. यातील भरत शिंदे हा हरहुन्नरी कलाकार तर आपल्या अभिनय शैलीतून रसिकांना खळखळून हसवतो. पथनाट्य, किर्तन व चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या माध्यमातून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिंदे यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शुक्रवार ता. ६ ऑगस्ट रोजी मुंबई बांद्रा येथील रंगशारदा ऑडिटोरीयम येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कल्याण जाणा व उपाध्यक्ष सोनम पाटील यांनी दिली.