बार्टीने अनुसूचित जातीतील बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे- ज.मो.अभ्यंकर
बार्टी व समाज कल्याणच्या विविध योजनांचा आढावा
पुणे दि.१८
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी समाज कल्याण चे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, श्री. के. आर. मेढे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.
अभ्यंकर म्हणाले, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी बार्टीने विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतानाच अनुसूचित जातीतील पदवी, पदविका धारक, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी आदी शिक्षण घेतलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हानिहाय माहिती संकलित करून त्यांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान शिष्यवृत्ती योजनांची उत्पन्नाची मर्यादा शिथिल करावी. बार्टीने संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमाला अधिक गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
. अभ्यंकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बार्टीतील विविध योजना व उपक्रमांची माहिती श्री. गजभिये यांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती आयुक्त डॉ. नारनवरे यांनी दिली.
बैठकीला बार्टी व समाज कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.