फलटण ! पतीच्या बाराव्या स्मृतिदिनी त्या 'माऊली'नेही सोडला प्राण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
फलटण : प्रतिनिधी
तरडगाव ता फलटण येथील शारदाताई विलासराव गायकवाड यांनी आपल्या पतीच्या बाराव्या स्मृतीदिनाच्या औचित्याने श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन केले होते .
        त्या सोहळ्याच्या सांगता किर्तनात हभप दिलीप महाराज झगडे यांचे काल्याचे किर्तन सुरू असतानाच बासष्ट वर्षीय शारदाताई यांनी आपला प्राण सोडला. सोळा नोव्हेंबर पासून विलास आप्पाजी गायकवाड यांच्या बाराव्या स्मृतिप्रीत्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह शारदाताई यांच्याकडे सुरू होता. दरवर्षी त्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ याचे आयोजन करीत होत्या. यावर्षी देखील पतीचे बारावे पुण्यस्मरण असल्याने त्यांनी वेळे आधीच हट्टाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठवडाभर संपूर्ण भागवत कथा त्यांनी बेडवर झोपूनच ऐकली. आज शेवटच्या दिवशी पाडेगाव येथील हभप दिलीप महाराज झगडे यांचे काल्याचे किर्तनादरम्यान बासष्ट वर्षीय शारदाताई विलास गायकवाड यांनी आपला देह सोडत पतीच्या ओढीने अनंतात विलीन झाल्या.  या अनोख्या घटनेने उपस्थितही हेलावून गेले . 
          या घटनेबाबत बोलताना किर्तनकार दिलीप महाराज झगडे यांनी शतकोत्तर अशी एखादी घटना घडत असते. आपल्या पतीच्या पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमात अस मरण येणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे असे सांगीतले. आज संध्याकाळी साडेसहा वाजता तरडगाव येथेच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
To Top