सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर सोमेश्वरचा नविन कारभारी कोण होणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
उद्या दि ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात सकाळी ११ वाजता पार पाडणार आहे. निवडीचे सर्व अधिकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः कडे राखून ठेवले आहेत. अजित पवार म्हणतील तोच कारखाण्याच्या कारभारी होणार आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत यानिवडी पार पडणार आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे हे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत.
सोमेश्वर च्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सोमेश्वर परीसरात चर्चा झडत आहेत. अनेक नवनिर्वाचित संचालकांना अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले असले तरीही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असल्याने ते आपले वजन नेमके कोणाच्या पारड्यात टाकतात हे उद्या स्पष्ट होणार आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे पारडे सध्या तरी जड मानले जात आहे. तर माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे देखील नाव चर्चेत आहे.
तर उपाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून अभिजित काकडे व जितेंद्र निगडे यांच्या नावाची चर्चा आहे. जर महिलांमध्ये उपाध्यक्षपदाची संधी दिली तर प्रणिता खोमणे यांच्या नाव आघाडीवर आहे.
मागील पाच वर्षात सोमेश्वरचा नावलौकिक राज्यात वाढविण्यासाठी विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मोठी मेहनत घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी जगताप यांच्या कामकाजावर विश्वास टाकला आहे. नविन संचालकमंडळात विद्यमान अध्यक्षांसह पाच चेहरे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर तेरा नवे चेहरे प्रथमच संचालक झाले आहेत. चार तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्यात अभ्यासू आणि सहकारातील ज्ञान असणारा अध्यक्ष व्हावा अशीच सभासदांची इच्छा आहे. नविन अध्यक्षांसमोर उच्चांकी दरा बरोबरच सध्या सुरु असलेले विस्तारीकरण वेळेत पुर्ण करून सभासदांचा संपूर्ण ऊस गाळपासाठी आणणे हे आव्हान असणार आहे. शिवाय नविन प्रकल्प उभारून मागील पाच वर्षांप्रमाणे सभासदांच्या हिताचे निर्णय ही घ्यावे लागणार आहेत. सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संचालकमंडळाने विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.