ज्याला औषधाशिवाय शांत झोप लागते तोच जगातला श्रीमंत माणूस : किशोर काळोखे !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
धावपळीच्या जगण्यात माणूस सवयीने धावतो व अंदाजाने जगत आहे, पैसे मिळून श्रीमंती येते हे अर्धसत्य आहे. वास्तविक पाहता औषधाशिवाय ज्यांना झोप लागते तोच जगातील श्रीमंत माणूस होय असे मत प्रसिध्द विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर काळोखे यांनी व्यक्त केले. 
         महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह निमित्त बुधवार दिनांक १७/११/२०२१ रोजी आयोजित केलेल्या 'ताण तणाव व व्यवस्थापन' या विषयावर  काळोखे पुढे म्हणाले की, हृदयविकार व रक्तदाब यासारखे आजार हे तणावामधून निर्माण होतात. सतत कामाचा ताण, दुरावलेले नातेसंबंध, व्यसनांचे सेवन यामुळेच मणुष्य मनाने दुबळा आणि कमकुवत झालेला आहे. माणसाने आपले जगणे हे निसर्गाच्या नियमानुसा जगायला हवे. तंत्रज्ञान विकसीत झाले म्हणून आपण आपली झोप नष्ट होऊ देता कामा नये. जीवनशैली आधुनिकतेच्या नावाखाली अनियमीत करु नये. कुटूंबाला गुणवत्तापूर्वक वेळ दिल्यास घरोबा टिकतो तर कामातील गुणवत्ता जोपासल्यावर आपण कौतुकास पात्र ठरतो. ताण आवश्यक आहे मात्र अनावश्यक ताण हा निरुपयोगी आहे. चालणे व बोलणे हे शरिर आणि मनाचे पैलू आहेत ते नियमीत हवेत. हास्य हा रामबाण उपाय असून औषधाच्या गोळीपेक्षा निर्व्यसनी मित्रांची टोळी उपयोगी ठरते.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले की, सध्याच्या आधुनिकतेच्या युगामध्ये ताणतणावाचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. कामगारांनी मनावर कोणताही ताण न घेता काम केल्यास नक्कीच उत्तम दर्जाचे काम होते व ताण तणावामुळे निर्माण होणारे धोके टाळता येतात. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे पुणे विभाग अध्यक्ष हिरामण सातकर यांनी बारामती तालुक्यातील सहकार चळवळीची मुहूर्तमेढ श्री सोमेश्वर कारखान्यापासून झाली व सहकारातील साखर कारखानदारीमध्ये नामांकित साखर कारखाना म्हणून आज महाराष्ट्रात श्री सोमेश्वरची ओळख निर्माण झालेली असलेने आम्ही आजचा हा सहकार सप्ताह कार्यक्रम आपले कारखान्यावर ठेवला असलेबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व कारखान्याचे व्हाईस चेअरमन  आनंदकुमार होळकर यांनी देखील ताणतणाव कमी करणेबाबत अध्यात्मीकतेकडे गेले पाहिजे, दररोज ४० मिनीटे प्राणायम, योगासने, चालणेचा व्यायाम करणेबाबत त्यांनी कामगारांना सुचित केले.
            यावेळी कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे, किसन तांबे,  हरिभाऊ भोंडवे, माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, राज्य सहकारी संघाचे संचालक  संजय बारवकर, नेवसे तसेच सर्व खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे लेबर ऑफीसर  दिपक निंबाळकर व आभार प्रदर्शन ई.डी. केदारे यांनी केले.
To Top