सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
'फिनिक्स करिअर मेंटॉर्स' या संस्थेच्या वतीने यावर्षीचा 'राजमाता जिजाऊ आदर्श पालक-२०२२' पुरस्कार कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या मातोश्री रंजना श्रीधर आवटे व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या मातोश्री अक्काताई मनोहर मुळे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांचे वंशज विक्रमसिंहराजे जाधवराव व उद्योजक शेखर नेगी यांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन राजमाता जिजाऊ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी इंदिराबाई कडू यांचे प्रतिनिधी म्हणून निवृत्त पोलिस उपअधिक्षक बंधू आत्मानंद बोंडे यांची ग्रंथतुला करण्यात आली.
उद्योजक मुले घडविणाऱ्या सुलोचना बाबुराव तावरे, सामाजिक कार्यकर्ता घडविणाऱ्या कलावती दत्तात्रेय नाशिककर, 'मुळशी पॅटर्न'फेम प्रवीण तरडे यांच्या मातोश्री रूक्मिणी विठ्ठल तरडे, शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख यांना आकार देणाऱ्या शांताबाई लक्ष्मण देशमुख, सामान्य घरातून असामान्य कामगिरी करणाऱ्या नंदा अरविंद अभिनकर, गरीबीतूनही मुलाला व नातवाला आयर्न मॅनपर्यंत पोचविणाऱ्या लक्ष्मीबाई रामचंद्र ननवरे व पालकत्वाविषयी समाजभान जागे करणाऱ्या जयश्री देशपांडे यांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी 'पालकत्व' विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नासिर इनामदार, प्राजक्ता कोळपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्या नेवे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले. कार्यक्रम समन्वयक विक्रम ननवरे यांनी प्रास्ताविक केले तर विराज देशमुख यांनी आभार मानले.
----------------------------
सुनिता कोंढाळकरांना विशेष पुरस्कार
विशेष मुलीचा सांभाळ करत असताना दोन मुलांना उद्योजक म्हणून बाळकडू पाजणाऱ्या माता सुनिता संतोष कोंढाळकर यांना विशेषरित्या 'राजमाता जिजाऊ आदर्श पालक' पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय एका वर्षात १०२ वंचित व निराधार व्यक्तिंना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल चैतन्य हनुमंतराव सावंत व हेमंत विलास गायकवाड यांना 'श्रावणबाळ' या पुरस्काराने तर स्वतःच्या मुलाच्या अपहरणाच्या कटू अनुभवातून गुप्तहेर संस्था स्थापन करून अडीचशे अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेणाऱ्या सूर्यकांत भांडे पाटील यांना 'बहिर्जी नाईक' पुरस्काराने गौरविण्यात आले.
---