सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम(ता. बारामती) अंतर्गत येणाऱ्या कुरण-(भंडलकरवस्ती) वरील गेल्या ५० वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे.
यामुळे भंडलकरवस्तीवरील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत अध्यक्ष जगताप यांचे आभार मानले. मुरूम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कुरणवस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर भंडलकर यांची १० कुटुंब राहतात जवळपास ६० ग्रामस्थांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. एवढेच काय तर स्वतःची वाहनेही दुसऱ्यांच्या दारात लावावी लागत होती. शेतात जाण्यासाठी, जनावरांना चारा आणणे, मुलांना शाळेत जाण्यासाठी बांधाचा वापर करावा लागत असे. मुख्य रस्त्यापासून केवळ आरधा किलोमीटर अंतर असूनही गावाच्या गटातटातील राजकारणामुळे गेल्या ५० वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर मंगळवार दि. १ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ ग्रामस्थ, स्थानिक भंडलकर कुटुंबातील सदस्य, पुरुषोत्तम जगताप यांनी योग्य समन्वय साधत येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.
सध्या या रस्त्याच्या सीमा कायम करण्यात आल्या असून तातडीने मुरुमीकरण करण्यात येणार आहे. एकनाथ शिवराम भंडलकर यांच्या गटातून ८ फूट रुंदीचा हा रस्ता तयार करण्यात आला आहे. यावेळी पुरुषोत्तम जगताप यांच्यासह दुध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, डॉ. मनोहर कदम, डॉ. विजय भंडलकर, रंगराव जगताप,दिलीप वाडकर, चंद्रकांत जगताप, राजेंद्र कदम, हरिश्चंद्र जगताप, विष्णुपंत चव्हाण, संजय भंडलकर, एकनाथ भंडलकर आदी उपस्थित होते.
COMMENTS