बारामती ! शासकीय आदेशाला होळ ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांकडून केराची टोपली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) येथील गावठाण हद्दीत राहणाऱ्या वाघ कुटंबाला घरातून बाहेर पडण्यास रस्ता नसल्याने शेजारील असलेल्या शासकीय जागेतून रस्ता व्हावा म्हणून वहिवाट करण्यास परवानगी मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे रस्त्याची तीन वर्षापासून मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देत संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही पुढे पंचायत समिती बारामती यांना पत्राद्वारे आपण यावर चौकशी करुन निर्णय घ्यावा  असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पंचायत समिती बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करुन होळ ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी आदेश देऊन या शासकीय जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवावा असे सांगितले होते मात्र होळ ग्रामपंचायतीने या विषयाला राजकीय स्वरूप देऊन हा विषय अद्याप अजेंठ्यावरही घेतला नसल्याचे होळ ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक वाघ यांनी सांगितले.
          मी स्वतः सदस्य म्हणून माझे मत नोंदविले असता त्यावर निर्णय दिला जात नाही किंवा इतिवृत्तांत(प्रोसिडिंग)दाखवले जात नाही. हे प्रकरण विरोधकांचे आहे म्हणून ते जागीच दाबुन टाकायचं अस ग्रामपंचायतीचे धोरण आहे.विरोधीगटाची कामे होऊ नयेत असा सत्ताधारी गटाचा मनसुबा आहे.  जेणेकरून विरोधकांचा आवाज दाबुन टाकल्यावर कोणी जाब विचारणार नाही असा सत्ताधारी गटाचा दृष्टीकोन आहे असा आरोप वाघ यांनी केला आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी याबाबत चौकशी अहवाल मागूनही त्याला होळचे सरपंच व ग्रामसेवक केराची टोपली दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सदाशिव रामचंद्र वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत वहिवाटीसाठी रस्ता देण्याची मागणी केली होती. दीपक वाघ यांनी गटविकास अधिकारी बारामती यांना लेखी तक्रार अर्ज दिला असून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सदस्य असूनही मला माहिती देत नाहीत व  जाणूनबुजून माहिती लपवत असल्याचे म्हटले आहे. 
To Top