सोमेश्वर रिपोर्टर टीम ----
सोलापूर प्रतिनिधी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने लोकांपर्यंत संदेश तत्काळ पोहोचवावेत. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्याने धरणातील पाणी विसर्गाचे नियोजन करण्याच्या सूचना अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या.
पुणे विभागाची मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत डॉ. रामोड बोलत होते. बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पुण्यातून उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑनलाईन उपस्थित होते.
डॉ. रामोड यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरित सादर करावा. गावनिहाय, तालुकानिहाय आराखडे तयार करावेत. मार्गदर्शक तत्वानुसार आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंपदा विभागाने एक अधिकारी आपत्तीसाठी नेमावा. दर दोन तासांनी पाऊस, पाणी स्थिती याची माहिती जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना द्यावी. आपत्तीचा सामना करण्यासाठी साधन-सामग्रीचा आढावा घ्यावा. बाधित क्षेत्राचा अब्यास करून त्याचे विकेंद्रीकरण करावे. त्वरित प्रतिसाद प्रणाली (आयआरएस) प्रत्येक जिल्ह्यात लागू केली असून आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संपर्काची यादी तयार करा
आपत्ती अचानकपणे येत असल्याने त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी. अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करावी. ज्या गावात आपत्तीची शक्यता आहे, तिथल्या सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांची यादी अद्ययावत करावी. एनडीआरएफ पथकाची वेळेपूर्वी मागणी नोंदवावी. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवा
आपत्तीची शक्यता ग्रहित धरून गावात पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. शिवाय जनावरांच्या लसीची तयारी ठेवावी. पूर काळात नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. टीसीएल पावडर उपलब्ध करावी. पुरात मृत होणाऱ्या जनावरांचे पंचनाम्यानंतर त्वरित दफन करावे, अशा सूचनाही डॉ. रामोड यांनी दिल्या.
यांनी सांगितले की, 22 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील 105 गावे पूर बाधित होतात, मात्र 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने 623 गावे बाधित झाली होती. त्यानुसार सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला पूर आला तर साधनसामग्री नाही, बोट, रोप आदी साहित्य खरेदी करण्यासाठी दोन कोटी निधीची आवश्यकता आहे, तो शासनस्तरावरून मंजूर व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
पंढरपूर वारी नियंत्रणासाठी यशदा प्रशिक्षण
पंढरपूरला 10 जुलै 2022 रोजी आषाढी वारी होत आहे. कोरोना निर्बंध सैल केल्याने यंदा 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेला यशदाकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाकडून प्रथमोपचार गट तयार करण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी अलर्ट देण्यात आले आहेत. औषधांचा साठा, पाणी शुद्धीकरण साधनांचा पुरवठा करण्यात आला असून सध्या शाळा, सरकारी इमारतींची डागडुजी करण्यात येत आहे.
श्री. शिवशंकर म्हणाले, सोलापूर शहरातील साफ सफाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाले-सफाईचे कामही होत आले आहे. शहरात पाणी साठणाऱ्या ठिकाणची माहिती घेऊन पाणी साठणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.