सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संत सोपानकाका पालखी सोहळा मंगळवारी सोमेश्वर कारखान्यावरील मुक्काम आटपून बुधवारी (दि. २९) सकाळी करंजेपूल येथून पुढे सोरटेवाडी येथे दाखल झाला. सोरटेवाडी येथे सकाळी नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी पारंपरिक आणि उत्साहात पालखीचे स्वागत केले. वारकऱ्यांच्या वतीने या वेळी विठूनामाचा गजर करण्यात आला. यानंतर येथील केंजळेवाड्यात पादुकांचे पूजन करण्यात आले. पूजेचा मान येथील केंजळे कुटुंबाला आहे.. त्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी विकास केंजळे, प्रसाद केंजळे, नितीन कुलकर्णी, सरपंच दत्तात्रेय शेंडकर उपस्थित होते.
तत्पूर्वी सोमेश्वर कारखान्यावरील मुक्काम उरकून पालखी पुढे मार्गस्थ झाली. सोमेश्वर कारखाना येथे सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. करंजेपूल येथे सरपंच वैभव गायकवाड, सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विशाल गायकवाड, अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने फळांचे वाटप, उपवासाचे पदार्थ तथा चहा-नाश्त्याची सोय केली होती. सोरटेवाडी येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदीरात पालखी विसाव्यासाठी व दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. ग्रामपंचायतच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच परिसरातील ग्रामस्थांनी नाश्ता, फळे व बिस्किटांचे वाटप केले. होळ येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले. यानंतर दुपारी चार वाजता पालखी वडगाव निंबाळकर आणि कोऱ्हाळे बुद्रुक येथे मुक्कामी विसावली.
.........................