बारामती ! नागरिकांच्या मनात सुरक्षितता आणि दंगेखोरांना भय निर्माण करणारा डॅशिंग पोलिस झाला फौजदार....!वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे शरद वेताळ याना फौजदारपदी बढती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे डॅशिंग अधिकारी व सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद वेताळ यांना आता पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.  वेताळ यांच्या आजवरच्या ३९ वर्षांच्या सेवेतील सर्व पदोन्नती वडगाव निंबाळकर ठाण्याच्या सेवेतच झाल्या आहेत. परिसरात कणखर व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या वेताळ यांच्या बढतीबद्दल सहकारी पोलिसांसोबतच परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले आहे.
                  मूळचे पार्थर्डी तालुक्यातील शरद वेताळ हे गेली ३९ वर्ष पुणे जिल्ह्याचेच झाले आहेत. १९८४ साली त्यांना पोलिस काँस्टेबल म्हणून लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सेवेची संधी मिळाली. त्यानंतर नारायणगाव, आळेफाटा, बेल्हा पोलिस ठाण्यात काम केले. १९९० साली वडगाव निंबाळकर येथे आले आणि इथेच हवालदार, जमादार म्हणून पदोन्नती झाली. नुकतेच २०१८ मध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली. बारामती शहर पोलिस ठाण्यात आणि शिरूर पोलिस ठाण्यात सेवा करून पुन्हा वडगाव निंबाळकरला आले. नुकतीच त्यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली.

वेताळ यांचा सेवाकाळ अनेक नाट्यमय आणि जिगरबाज कामगिरीने भरलेला आहे. लोणावळा येथे उमेश शेट्टी खून प्रकरणाच्या तपासात, नारायणगाव येथील चार व पिंपळवंडी येथील तीन मोठ्या दरोड्यांच्या तपासात त्यांना आपल्या बुध्दीचे व कणखर वृत्तीचे गुण दाखविण्याची संधी मिळाली. बेल्हे बाजाराला ट्रकमध्ये बसून निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातला आणि ट्रक कोसळला. काहींचे मृत्यू झाले होते. त्यावेळी पंधरा गंभीर जखमी लोकांना ट्रकमधून बाहेर काढून वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली आणि जिल्ह्याला वेताळ यांचा परिचय झाला. वडगाव निंबाळकर गावात वायरमनसोबत काम करणारा मामा गाडे हा तरून वीजेच्या तारेला चिकटला होता. जीवाची पर्वा न करता वेताळ यांनी त्याला हिसका देऊन सोडविले आणि मोलाचा जीव वाचला. त्या वेळी वृत्तपत्रांनी 'वेताळ आले आणि यमराज पळाले' अशा बातम्या देऊन वेताळ यांचे कौतुक केले होते. बारामती तालुक्यात सुरेश खोमणे या गुंडाकडे कट्टा असल्याची पोलिसांना टीप मिळाली. पोलिसांनी सापळा लावला आणि वेताळ यांनी खोमणे याच्याकडे पिस्तुल असतानाही झेप घेत त्याला ताब्यात घेतले. जीवाचा धोका पत्करला पण आठ पिस्तुल जप्त झाले. बाबुर्डी येथे कऱ्हा नदीच्या पुरात आठ महिला अडकल्या होत्या. वडगाव निंबाळकर पोलिसांनी रात्री एक वाजता त्यांना सुरक्षित बाहेर काढले त्यातही वरीष्ठांसह वेताळ सहभागी झाले होते.
काकडे महाविद्यालयाचे गॅदरिंग म्हणजे गोंधळ अशी अवस्था असायची. तसेच परिसरातील अनेक गावांच्या यांत्रा संवेदनशील असायच्या. काही गावांमध्ये तर यात्रांमध्ये हाणामाऱ्या व्हायच्या. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ यांनी काकडे महाविद्यालयात 'ब्लॅक बेल्ट'च्या कलेचे प्रदर्शन करत अनेकांना एकट्याने चोप दिला. त्यानंतर पुन्हा तसा दंगा झाला नाही. अनेक गावांमध्येही दंगेखोरांना दंडुक्याचा हिसका दाखवून यात्रांना वळण लावण्याचे काम त्यांनी धोका पत्करून केले. वेताळ यांच्या बढतीच्या निमित्ताने त्या आठवणी काढल्या जात आहेत. अशा लोकाभिमुख कामांमुळे वेताळ यांचा चाहता वर्ग नागरिकांमध्ये तयार झाला आहे. वय निवृत्तीच्या दिशेने सरकत असले तरी त्यांचा फीटनेस तीशी-चाळीशीच्या तरूणाला लाजवेल असा आहे. त्यामुळे फौजदारपदी निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेताळ यांनी नम्रपणे, मी माझी ड्युटी करतो. वेगळे काही करत नाही असे मत व्यक्त केले. तसेच आतापर्यंत आमच्या वरीष्ठांचे आणि लोकांचेही प्रेम मिळाले त्यामुळे एकही ताकीद, नोटीस न मिळता सेवा पार पडली. वरीष्ठांनी दिलेल्या संधीबद्दल आभारी आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या.
To Top