सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मेढा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याचे लक्ष लागुन राहीलेल्या जावली महाबळेश्वर बाजार समितीत तीन आमदारांच्या एकत्र येण्याने शेतकरी पॅनलचा विजय झाला असून राष्ट्रवादीच्या फुटीमुळे महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर बाजार समिती स्थापने पासुन राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामधून निवडून आल्यानंतर होवु घातलेल्या बाजार समितीची सत्ता भाजप कि राष्ट्रवादी कोणाकडे जाणार असे जनतेला वाटत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील यांना आपलेसे केले. शेतकरी पॅनलची स्थापना करून राष्ट्रवादीला भगदाड पाडून बाजार समितीच्या निवडणूकी एकहाती सत्ता काबीज केली आहे.
जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १८ जागा जिंकून बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवली आहे. माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ माझी जि.प.सदस्य दीपक पवार तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या एकत्रित महाविकास आघाडीला मात्र एकही जागा जिंकता आली नाही.
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले होते. याकरता आपले सर्व राजकीय संघर्ष बाजूला ठेवून संस्थेवरचा निवडणुकीचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी तीन आमदार एकत्रित आले. मात्र या प्रक्रियेत आपल्याला विचारात घेतले नाही असा आरोप करीत आमदार सदाशिव सपकाळ व जि प सदस्य दीपक पवार यांनी महाविकास आघाडीचे पॅनल उभे केले. यामुळे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल अशी सरळ सरळ लढत झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये सरासरी 84 टक्के मतदान झाले. यात महाविकास आघाडी नेमके किती मतदान घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शनिवारी 29 तारखेला मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी योगिता राजेंद्र शिंदे, कमल दिलीप दळवी, इतर मागास प्रवर्गातील मनेष जयसिंग फरांदे,भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून तुकाराम जाणू शिंदे, हमाल मापाडी मतदारसंघातून सुंदर गोविंद भालेराव तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधीमधून रामचंद्र धोंडीबा भोसले हे बिनविरोध निवडून आले होते.उर्वरित १२ जागांसाठी २२उमेदवार रिंगणात होते.यात शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मताधिक्याने विजय मिळवला.
कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून हनुमंत सहदेव शिंगटे ( ५३७ मते) ,प्रमोद बाजीराव शेलार ( ५३० मते), प्रमोद शंकर शिंदे ( ५३१ मते), मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक ( ५३३ मते), जयदीप शिवाजीराव शिंदे (५४३ मते) ,हेमंत हिंदुराव शिंदे ( ५३५ मते) ,राजेंद्र सखाराम भिलारे ( ४६० मते) ,ग्रामपंचायत मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून पांडुरंग नामाजी कारंडे ( ८६५ मते), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून गुलाब विठ्ठल गोळे ( ५३२ मते ),बुवासाहेब एकनाथराव पिसाळ ( ८२१ मते ) तर व्यापारी अडते मतदार संघातून प्रकाश कृष्णाजी जेधे ( २२७ मते ), दत्तात्रय कोंडीबा कदम ( २२३ मते) यांनी विजय मिळवला आहे.
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलच्या मदतीने भाजप राष्ट्रवादीने एकत्रीत सत्ता मिळविली असताना बाजार समिती भाजपच्या कि राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार हे चेअरमन निवडीनंतर स्पष्ट होणार आहे. भविष्यात येणाऱ्या मेढा नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीवर भाजप राष्ट्रवादीचा पॅटर्न राहणार का अशी उत्सुकता जनतेला लागुन राहिली आहे.
दरम्यान मेढ्यामध्ये विजयी उमेदवारांनी गुलाल उधळीत बाजार पेठेतुन डॉल्बी लावुन मिरवणूक काढली. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS