सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा- जावली तालुक्यातील ५४ गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. बोंडारवाडी धरणाचे सर्वेक्षण करण्यास मान्यता मिळाल्यानंतर धरणासाठीची जागा निश्चित करून प्राथमिक सर्वेक्षण आणि भूस्तर वर्गीकरणाची विंधन विवरे (ट्रायल बोअर) घेण्याच्या कामासाठी कृष्ण खोरे महामंडळाच्या सर्वेक्षण ठोक तरतुदींमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे लवकरच प्राथमिक सर्वेक्षण सुरु केले जाणार आहे.
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण, भूस्तर वर्गीकरण, ट्रायल बिट आदी बाबींसाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करावा आणि ५४ गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा, यासाठी हा संपूर्ण प्रकल्प जलसंपदा विभागामार्फतच केला जावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार बोंडारवाडी धरण बांधण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करा आणि त्यासाठी लागणार निधी जलसंपदा विभागामार्फत उपलब्ध करावा, अशा सूचना ना. फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अभ्यासपूर्ण आणि सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून बोंडारवाडी धरण प्रकल्पाची जागा निश्चित करून प्राथमिक सर्वेक्षण आणि भूस्तर वर्गीकरणाची विंधन विवरे (ट्रायल बोअर) घेण्याच्या कामासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सर्वेक्षण ठोक तरतुदींमधून निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे कृष्ण खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता मी. द. कुलकर्णी यांनी लेखी आदेशाद्वारे पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना सूचित केले आहे. त्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे लवकरच प्राथमिक सर्वेक्षण सुरु केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध झाल्याने बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागण्यातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.
तातडीने सर्वेक्षण सुरु करून लवकरात लवकर अहवाल शासनाकडे सादर करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर बोंडारवाडी धरण बांधण्याच्या कामाला गती दिली जाईल आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्रकात नमूद केले.
प्रकल्प बाधितांचे तातडीने पुनर्वस करणार
दरम्यान, बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावताना येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन तातडीने करणार आहे. ज्यांची जमीन या प्रकल्पात जाईल त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून शासनाकडून योग्य प्रकारे हा प्रश्न सोडवू. त्यामुळे कोणीही चिंता करू नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी ग्रामस्थ आणि समस्त जावलीकरांना केले आहे.