बारामती ! सोमेश्वर कारखान्याच्या गेटकेन धारकांसाठी 'गोड बातमी' ! गेटकेन धारक होणार 'सोमेश्वर'चे 'क' वर्ग सभासद? : संचालक मंडळाचा मानस

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वप्रथम स्वतःच्या गुणवत्तेवर दर जाहीर करतो. एकीकडे एफआरपी मिळत नसताना सोमेश्वरने एफआरपीपेक्षा टनाला पाचशे रुपये जादा दर सभासदांना दिला आहे. सहकार टिकला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाठिशी आहेतच. शेतकरी, कामगार समाधानी रहावा यासाठी गेल्या आठ वर्षात सोमेश्वरने ३ हजर १०० रुपये सरासरी दर दिला आहे. सोमेश्वर कारखान्याने येणाऱ्या गाळप हंगामात १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच गेटकेन धारकांना क वर्ग सभासद करून घेण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
         सोमेश्वरने राज्यात एफआरपीपेक्षा प्रतिटन पाचशे रुपये सर्वाधिक दर दिला याबद्दल मुरूम (ता. बारामती) येथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने सोमेश्वरच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला त्यावेळी जगताप बोलत होते.
          यावेळी उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ज्येष्ठ ग्रामस्थ पोपटराव जगताप, संचालक राजावर्धन शिंदे, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, ऋषी गायकवाड, मुरूमचे सरपंच नंदकुमार शिंगटे, डॉ. अमोल जगताप, डॉ. राहुल शिंगटे, पी.के. जगताप, कौस्तुभ चव्हाण, प्रदीप कणसे, रमेश जगताप, अजयश्री पतसंस्थेचे चेअरमन माऊली कदम, सोसायटीचे चेअरमन विकास जगताप तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.  जगताप पुढे म्हणाले की दुष्काळ परिस्थितीमुळे सोमेश्वरला जवळपास दोन लाख टन गाळपाचा फटका बसला आहे. जिरायती भागात ऊस वाळून चालला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ व जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस तोडाला आहे. सोमेश्वर उपपदार्थावरही भर देत आहे.ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पंधरवड्यात कोजनची विस्तारवाढ होईल. उपाध्यक्ष प्रणिता खोमणे यांनी, पवार कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा शाश्वत विकास होत असल्याचे मत मांडले. 
माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले, फुले २६५ च्या लागवडीस प्रोत्साहन, ठिबक सिंचन, खत पुरवठा यातून कारखाना उसाबाबत स्वयंपूर्ण झाला.  सभासदांनी यावर्षी एक टिपरेही बाहेर देऊ नये. केंद्रसरकारच्या निर्णयांचा फायदा झाला असल्याचे सांगितले. यावेळी मुरूम ग्रामपंचायत, अजयश्री पतसंस्था,  मुरूम सोसायटी, मल्लिकार्जुन सोसायटी, मल्लिकार्जुन दुधसंस्था, शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ, सर्वोदय पतसंस्था, आधार पतसंस्था यांच्यावतीने  संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर मदने व प्राचार्य पी. बी. जगताप यांचा सत्कार करण्यात आला. फत्तेसिंग चव्हाण, निलेश शिंदे, संदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मनोहर कदम यांनी केले.
To Top