सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भोर-आंबाडे रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तात्पुरत्या स्वरूपात संबंधित विभागाकडून हे खड्डे भरले जात असले तरी मोठ्या खड्ड्यांची तात्काळ दुरावस्था होत असल्याने खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहने आपटून एक वर्षात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.
भोर- आंबाडे मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.दररोज शेकडो दुचाकी,चारचाकी वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून होते.रस्ता उताराचा असल्याने पावसाळ्यात रस्त्याला पाणी निघून जाण्यासाठी कैच्या मारल्या जात नसल्याने पाणी रस्त्यावर साचते.परिणामी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था होत असते.मोठमोठे खड्डे पडतात याचा परिणाम वाहनचालकांवर होत असल्याने वाहनचालकांना वारंवार कसरत करावी लागते.मागील वर्षी याच रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आपटून दुचाकीवरील खानापूर येथील एक महिला दगावली होती.तर मागील चार दिवसांपूर्वी जेधेवाडीतील दुसरी महिला गाडी खड्ड्यात आदळल्याने रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.संबंधित विभाग अजून किती बळी गेल्यानंतर भोर- आंबाडे मार्गावरील खड्डे बुजवणार असा प्रश्न वाहन चालकांना दररोज प्रवासावेळी पडत आहे.