सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भोर तालुक्यात गावागावांमध्ये सर्रास विठ्ठल- रक्मिणी मंदिरे असून आषाढी एकादशी नमित्त बुधवार दि.१७ भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याने मंदिरे भक्तिमय होऊन गेली होती.तर विठ्ठल नामाच्या गजरात तालुक्याचा परिसर पूर्णतः दुमदुमून गेला.
तालुक्यातील वीसगाव,चाळीसगाव,बत्तीसगाव खोऱ्यात तसेच वेळवंड व हिरडस मावळ परिसरातील गावोगावच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना दुग्धाभिषेक घालून मूर्तींची भाविकभक्तांकडून मनोभावे तुळस, बेलफुलाने पूजा करून आरती केली गेली.तर बहुतांशी मंदिरांमध्ये विठ्ठल नाम तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या निनादत भजन केले गेले.अनेक ठिकाणी सामुदायिक हरिपाठ वाचन करण्यात आले.यामुळे पहाटेपासूनच मंदिरे भक्तिमय होऊन गेली होती.धावडी, हिर्डोशी (धामणदेव ),नेरे,खानापूर,बाजारवाडी येथे तर भोर शहरातील पोथ्या विठ्ठल मंदिरात भक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले.त्याबरोबरच आषाढी एकादशीनिमित्त भोर तालुक्यातील हजारो विठ्ठलभक्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले. कोणाचेही निमंत्रण आमंत्रण नसताना दहा ते बारा लाख लोक एकाच दिशेने एकच ध्येयाने प्रेरित होऊन पायी पंढरपूरकडे जातात. हे संपूर्ण जगातील मोठे आश्चर्य आहे.असे सांप्रदायिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून असणारे संपत दरेकर यांनी सांगितले.
COMMENTS