सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखा साताराच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत विक्रीसाठी पिस्तूल घेऊन आलेल्या आरोपीला ताब्यात घेत चार पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा दोन लाख एकसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. घटनास्थळावरून एका आरोपीने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन व्यक्ती खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी या ठिकाणी पिस्तूल व काडतुसांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. यावर पो.नि. देवकर यांनी सपोनि रोहित फार्णे व विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला कारवाईसाठी शिंदेवाडीला पाठवले.
दरम्यान, पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी येथे असणाऱ्या एका ऍग्रो कंपनीच्या सुरक्षाभिंतीच्या कडेला पिस्तुलाच्या विक्रीसाठी आलेले दोन युवक स्थानिक गुन्हे शाखेला दिसले. दोघांनाही पकडण्यासाठी प्रयत्न केले परंतु एक जण घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला. शुभम उर्फ सोनू अनिल शिंदे (रा.महर्षीनगर, स्वारगेट पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेत चार देशी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख एकसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दिग्विजय उर्फ सनी देसाई (रा.सिंहगड कॅम्पस, पुणे) हा घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
या दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंद हे करीत आहेत.