Purandar News l राख-रणवरेवाडी परिसरात वनगायींचा धुडगूस : शेतकऱ्यांची उभी पिके फस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे 
राख-रणवरेवाडी ता. पुरंदर गावातील शेतकऱ्यांची उभी पिके मोकाट गाईंनी फस्त केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
           गावातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून मोकाट जनावरांच्या समस्येचा मोठा सामना करावा लागला आहे. मोकाट जनावरांनी शेतातील गहू, ज्वारी, मका आणि कांद्याचे पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत. काल रात्री ५०-६० मोकाट जनावरांनी हिरामण हाके, रामा हाके, बिरा हाके, भागवत सोनवणे, गुणवंत सोनवणे यांचे ज्वारी पीक, तसेच रत्नाकर रणनवरे यांचे गहू आणि हरभऱ्याचे पिक नष्ट केले. चार ते पाच एकरातील उभे पीक पूर्णपणे नष्ट केले आहे
           गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती सतत सुरू असून, शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांची मोकाट जनावरांकडून होणारी नासाडी त्यांना भविष्यातील अडचणींचा सामना करायला लावते आहे. शेतकऱ्यांनी प्रसाद सोनवणे यांच्या माध्यमातून शासनाकडे तक्रार केली आहे आणि सरकारकडून या समस्येचे कायमस्वरूपी समाधान करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
       शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासनाने या गंभीर समस्येवर अजूनही कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आधीच अडचणीत असताना मोकट जनावरांमुळे त्यांच्या कष्टाचे फळ नष्ट होणे हे अत्यंत दुःखद आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांचे अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
To Top