लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथे ५ दिवस घेण्यात आलेल्या 'शरद' कृषी प्रदर्शनातील विविध स्वरूपाच्या
कार्यक्रमामुळे हे शरद कृषी प्रदर्शन बहुचर्चित असे ठरले. उद्घाटना पासून ते सांगता समारोपापर्यंत 'शरद कृषी प्रदर्शन' महोत्सवात प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राजेंद्र पवार तसेच नंतर हजर राहीलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, सुनंदा राजेंद्र पवार यांनी या शरद कृषी प्रदर्शनाचे व डाॅक्टर नितीन सावंत यांचे विशेष कौतूक केले. शरद कृषी प्रदर्शनात लहान बालकांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत तसेच महिला वर्ग, तरुण वर्ग आणि शेतकरी बांधव यांच्या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळाले. प्रदर्शनात तसेच लोणंद बाजारपेठेत यामुळे कोटींची उलाढाल झाल्याने लोणंदची मरगळलेली बाजारपेठ ही गतिमान झालेली असून बाजार यंत्रणेला अच्छे दिन आलेले बघायला मिळत आहे.
लोणंद येथील 'शरद कृषि प्रदर्शन' हे १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या या प्रदर्शनात प्रत्येक दिवशी अनुक्रमे ऊस, केळी,फुले, फळे, भाजीपाला तसेच पशु पक्षी प्रदर्शन ,
बैल, गाय,शेळी मेंढी आदी स्पर्धा संपन्न झाल्या. तर युथ फेस्टिव्हल, लोणंद तसेच परिसरातील अनेक शाळेतील मुलामुलांनी सादर केलेले नेत्रसुखद सांस्कृतिक कार्यक्रम यांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
कृषी प्रदर्शनातील विशेष आकर्षण असलेल्या जगातील सर्वात बुटकी मुऱ्हा जातीची 'राधा' म्हैस पाहण्यासाठी लोक आवर्जून भेट देत होते. एक टनाचा रामा व सुलतान रेडा, बारामतीचा खिलार कोसा माऊली बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. पशुपक्षी, फळ झाडे ,शेवगा, भोपळा, जनावरे, शेतीतील विविध विकसित झालेले तंत्रज्ञान आदी पाहण्यासाठी लोकं आपली अख्खी कुटुंबच घेऊन आलेली होती. विविध जातीचे जनावरे खिलारी बैल, गाय, खोंडे वासरे, रेडा , मुऱ्हा जातीची म्हैस, जर्सी गाय आदी जनावरे एकत्रित पाहण्याची संधी यानिमित्ताने लोकांना मिळाली.
प्रदर्शनात ज्या बचत गटांच्या माध्यमातून नवनवीन उद्योगांची निर्मिती केली जात असतात.अशा विविध बचत गटांचे स्टॉल ही लावण्यात आलेले होते. घरगुती वापरातील वस्तूंपासून ते लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या मनोरंजनाची साधने उपलब्ध होती. युथ फेस्टिवलचा थरार हा मालोजीराजे विद्यालय ,मुलींचे न्यू इंग्लिश स्कूल, सेंट ॲन्स इंग्लिश मिडियम स्कूल , तसेच लोणंद व परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी आपल्या कलेतून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमातून एक आनंददायी ,मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची झलक पाहायला मिळाली. यांमध्ये विद्यार्थी शेतीशी संबंधित गीते व इतर ही गीते सादर करीत असताना उपस्थितांनी विशेष दाद दिली . महिलांसाठी खास करून मोनिका करंदीकर यांचा 'खेळ पैठणीचा' होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आलेला या कार्यक्रमास महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचा सांगता समारोप हा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आला.