सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे विद्यापीठ : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील तिरूपती बालाजी मशरूम उद्योगाचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आज 'जीवनगौरव पुरस्कार-२०२५' देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर अभ्यंकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आदींच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त राज्यातील निवडक दहा मान्यवरांना आज श्री अभ्यंकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविन्यात आले. याप्रसंगी आर. एन. शिंदे व आशालता शिंदे यांनाही सावित्रीबाई फुले यांची मूर्ती, मानपत्र, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी इतिहासकार गो. बं. देगलूरकर, जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां. बा. मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांच्यासह आर. एन. शिंदे, मुकुंद पोतदार, दत्ता शिंदे, संजय शिंदे, उदय शिंदे, कुमार शिंदे, कांतीलाल चव्हाण, सूर्यकांत जेधे, अजित चव्हाण, अक्षय शिंदे फाऊंडेशनचे सदस्य संतोष शेंडकर, महेश जगताप, योगेश सोळष्कर, बाबूलाल पडवळ उपस्थित होते .
अत्यंत सामान्य कुटुंबातील शिंदे यांनी व्हीडीओ सेंटर, ऊस बांधणी, कापड दुकान असे छोटेखानी उद्योग करत २००६ मध्ये तिरूपती बालाजी मशरूम हा शेतीपूरक उद्योग सुरू केला. दररोज वीस टन दर्जेदार मशरूम निर्मिती करणारा हा उद्योग देशात क्रमांक एकचा ठरला असून शेकडो स्थानिक महिलांना यातून रोजगार मिळाला. यामुळे भारतीय अनुसंधान परिषदेच्या सदस्यपदी तसेच मणिपूर राज्याचे मशरूम उद्योग सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली. या कंपनीतून व अन्य व्यवसायातून मिळणारा काही टक्के नव्हे तर जवळजवळ संपूर्ण नफा समाजासाठी खर्च करतात. शिंदे यांनी अंगणवाड्यांच्या चार आदर्श इमारती उभारल्या असून केंद्रीय समितीने त्याची दखल घेतली. पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्याना गॅसजोड प्रदान करत अंगणवाड्या चूलमूक्त केल्या. तालुक्यातील चार जिल्हा परिषद शाळा टॅब व संगणक देऊन हायटेक करणे, गरजूंना शालेय साहित्य व सायकलचे वाटप करणे, परिसरातील शाळा-महाविद्यालयात प्रथम येणारास शिष्यवृत्ती देणे, तालुक्यात कोट्यवधी रूपयांची विद्यार्थ्यांसाठी बसस्थानके बांधणे अशी शैक्षणिक कार्ये केली आहेत. तसेच काकडे महाविद्यालयास दीड कोटींचे सांस्कृतिक भवन बांधून देणे, मागील दोन दुष्काळी वर्षांत कित्येक गावांना मोफत पाणीपुरवठा करणे, आरोग्यासाठी असंख्य लोकांना मदत करणे, आठशे गरजूंना दिवाळीत किराणा वाटप करणे अशी कामे त्यांनी केली आहेत. याशिवाय त्यांनी देहदानाचाही निर्णय घेतलेला आहे. याबद्दल त्यांना जीवनगौरव पूरस्काराने गौरविण्यात आले