सुपे परगणा l सुप्याचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध : या विकास आराखड्यात 'कही खुशी'....'कही गम'

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील प्रारुप विकास आराखडा ( डेव्हलपमेंट प्लॅन ) मंगळवारी ( दि. १८ ) ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्यावतीने १५ मार्चलाच याबाबत या प्रारुप विकास आराखड्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
           येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात येथील ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे आणि सरपंच तुषार हिरवे यांच्या उपस्थित या प्रारुप विकास आराखड्याविषयीची माहिती देण्यात आली आहे. यावेळी येथील गावठाण क्षेत्र आणि गायराण क्षेत्र या ठिकाणचे वेगवेगळे दोन नकाशे तयार करण्यात आले आहेत. या नकाशामध्ये खाजगी ( गावठाण मधील ) आणि शेत जमीनीमधील काहींचे क्षेत्र आरक्षीत करण्यात आले आहे. तर काही खाजगी ( गावठाण ) जागेमधुन रस्ते काढण्यात आले आहे. त्यामुळे  हा प्रारुप विकास आराखड्यानुसार बऱ्याच ग्रामस्थांच्या जागांवर गंडांतर येत असल्याने कही खुशी कही गम सारखा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:चे काही आक्षेप असल्यास जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत आपल्या हरकती बारामती नगर रचनाकार कार्यालय आणि जिल्हा परिषद पुणे येथे नोंदवायच्या असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे आणि महेंद्र बेंगारे यांनी दिली. 
        येथील गावचा प्रारुप विकास आराखड्यामुळे जास्तीत जास्त विकास होईल. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या आराखड्याच्या आगोदर बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालय, वीज वितरण, पोलीस स्टेशन, पेयजल योजना आदीकरीता सुपे गायराणमधुन सुमारे ६० ते ७० एकर क्षेत्र शासनाच्या विकासकामाकरीता दिलेले आहे. 
      सुप्याची लोकसंख्या ५ हजार असताना प्रारुप विकास आराखड्याची आवश्यकता नव्हती. या आराखड्यामुळे अनेक गोरगरीब भुमिहीन होणार असल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यात लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती तालुका दुध संघाचे संचालक सुशांत जगताप यांनी दिली. 
To Top