सोमेश्वर रिपोर्टर टीम----
खराडी : प्रतिनिधी
पुण्यातील विमानतळ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बापाने आपल्या 3 वर्षीय मुलासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं पत्नीवर असलेल्या रागातून चक्क लहाग्याचा धारदार चाकुने गळा चिरला आहे.
शुक्रवार दि. २१ रोजी दुपारी पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका दर्गाजवळ निर्जनस्थळी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. बापानेच मुलाची गळा चिरून हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हिंमत माधव टिकेटी असं हत्या झालेल्या तीन वर्षीय मुलाचं नाव आहे. तर माधव साधुराव टिकेटी असं ३८ वर्षीय मारेकरी बापाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. आरोपी माधव याचे मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय माधवला होता. यातून त्याचे अनेकदा पत्नीसोबत खटके उडत होते. गुरुवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता.
या वादानंतर आरोपी माधव आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला. यावेळी पत्नी स्वरुपा यांनी माधवला फोन करून 'मुलगा कुठे आहे?' असं विचारलं. तेव्हा मी मुलाला घेऊन सिगरेट प्यायला आलोय, असं माधवने सांगितलं. त्यानंतर बराच वेळ माधव घरी आला नाही. पत्नी माधवला फोन करत होत्या. पण तो गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. शुक्रवारी दुपारी चिमुकल्याचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आरोपी माधव टिकेटी हा मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी आहे. त्याला आठ वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा होता. दोन मुलं आणि पत्नीसह तो पुण्यातील विमानतळ भागात वास्तव्याला होता. गुरुवारी पत्नीसोबत झालेल्या वादातून उच्चशिक्षित असलेल्या आयटी इंजिनिअरने आपल्याच तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरला आहे. बापानेच चिमुकल्याचा अशाप्रकारे जी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.