सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील तुकाराम गणपत खोमणे या शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या गोठ्यावर बुधवारी मध्यरात्री लांडग्यांच्या टोळीने हल्ला केला. यामध्ये तीन बोकड आणि एक शेळी मृत्यूमुखी पडली आहे.
यामुळे शेतकऱ्याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. कोऱ्हाळे खुर्द येथे नीरा नदीकाठी लिफ्टवस्ती येथे खोमणे यांचा आफ्रीकन बोर जातीच्या शेळ्यांचा नावाजलेला गोठा आहे. या जातीच्या बोकड आणि शेळ्यांना बाजारत मोठी किंमत मिळते. बुधवारी मध्यरात्रीनंतर लांडग्यांनी पाच ते सात फुटी तारेचे कंपाऊंडवरून गोठ्यात उड्या घेतल्या. तीन बोकडांचा बळी घेतला. या हल्ल्याच्या भितीने एका शेळीचा घाबरून मृत्यू झाला. पशुसंवर्धन अधिकारी अवधूत जोशी यांनी शवविच्छेदन केले तर वनपाल जहीर शेख व त्यांच्या पथकाने पंचनामा केला आहे.
या घटनेत शेतकऱ्याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
वनपाल जहीर शेख म्हणाले, आमच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून सदर हल्ला तरस किंवा बिबट्याचा नसून लांडग्याचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. वनविभागाच्या धोरणानुसार नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.