सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत म. ढावरे
लोणंदमधे भरदिवसा एका बॅंकेच्या समोरून एका इसमाच्या अडीच लाख रूपयांची रोकड अज्ञात चोरट्याकडून लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दिनांक १५ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास लोणंद निरा रोडलगत असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या समोर एका व्यक्तीच्या अडीच लाख रूपये असलेल्या बॅगेवर अज्ञात चोरट्याकडून डल्ला मारण्यात आल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समजत असून लोणंद पोलीस याप्रकरणाचा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास करत असल्याचे समजत आहे.
लोणंद आणि परिसरात अलीकडच्या काळात भरदिवसा होणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांबद्दल नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडेगाव येथील नेवसेवस्तीवरील एका घरात घुसून भरदिवसा सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना घडली होती तर गेल्यावर्षी शास्त्रीचौक परिसरातूनही अशाच प्रकारे एका व्यापाऱ्यांचे गाडीला अडकवलेल्या पिशवीतून अडीच लाख रुपये लांबविलेल्या घटनेबाबत अजूनपर्यंत काहीच हाती लागले नसल्याचे समजत आहे. लोणंदमधे या प्रकारे पैशे लांबविण्यात आल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडलेल्या आहेत मात्र एखाददुसरे प्रकरण वगळता हे प्रकार उघडकीस येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
लोणंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा परिसर हा पोलीस ठाण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक असून त्यातही पुरेशा मनुष्यबळा अभावी लोणंद पोलीसांना कायदा सुव्यवस्था अबाधित राखताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लोणंद पोलीस ठाण्याला सध्या अधिकारी दर्जाचे एक सहायक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक असे कार्यरत आहेत मात्र लोणंद सारख्या मोठ्या पोलीस ठाण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असावा असे जनमत वाढती गुन्हेगारी पाहता नागरिक व्यक्त करत आहेत.