सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
मोरगाव येथे रूढी परंपरेचे काही प्रकार टाळून विज्ञानवादी पद्धतीने आधुनिक 'शिवविवाह' पार पडला असून तालुक्यात याची चर्चा सुरू झाली आहे. पुरोहित न बोलविता शिवाचार्य भगवानराव बागल यांनी विधी पार पाडले तर बळीराजा पूजन, जिजाऊ प्रतिमा पूजन, फुलांच्या अक्षता, शिवमंगलाष्टका अशा नव्या गोष्टींचा उपयोग करत साळुंके-चव्हाण विवाह समारंभ पार पडला.
मोरगाव येथे बारामती केदारी मागल कार्यालयात तालुक्यातील पळशी येथील रोहिणी व हनुमंत चव्हाण यांचा मुलगा संपत व उंबरओढा येथील उज्वला व जालिंदर साळुंके यांची मुलगी अंजली यांचा शिवविवाह रविवारी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण भापकर, रंगनाथ नेवसे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बारामती तालुक्यातील हा आठवा तर पश्चिम भागातील हा तिसरा शिवविवाह आहे.
मराठा सेवा संघाने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या बैठकीत साधेपणाने शिव विवाह घेण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देताना निवृत्त सैनिक मुलीचे वडील जालिंदर साळूखे व मुलाचे वडील हनुमंत चव्हाण यांनी अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी टाळून आधुनिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुहूर्त पहिला नाही आणि लग्नाची पत्रिकाही वेगळी होती.
रविवारी दुपारी लग्नसमारंभात वऱ्हाडी मंडळींसमोर डॉ. कोकाटे यांनी जिजाऊ व शिवराय यांच्या विज्ञानवादी व आधुनिक विचारांची मांडणी केली. गृहप्रवेश, वास्तुशांत, पत्रिका, मुहूर्त हे थोतांड असून समतेचा आणि अंधश्रद्धामुक्तीचा पुरस्कार करा असे आवाहन केले. सुरेश खोपडे यांनी, केवळ विज्ञानाच्या सोयीसुविधांचा लाभ घेऊ नका तर कर्मकांडातून मुक्त होत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा असे आवाहन केले. वधू व वराच्या आगमाननंतर 'बळीराजा'च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. वधू-वरांना व्यासपीठावर घेऊन श्रोत्यांकडे हात जोडून उभे राहण्यास सांगण्यात आले. यानंत अरविंद जगताप यांनी सामूहिक जिजाऊ वंदना सादर केली. शिवाचार्य भगवानराव बागल यांनी शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, आता सावध व्हा वधुवरा लेखणीने गुलामगिरी नष्ट करा या ओव्या मंगलाष्टकांच्या सुरात गायल्या. वऱ्हाडी मंडळींनी वधूवरांवर तांदूळाच्या अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार अर्पण केल्यावर दोन तासांचा विवाहसोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, माणिक मासाळ, रंगनाथ नेवसे उपस्थित होते. मुख्याध्यापक अरविंद जगताप व पळशीचे माजी सरपंच बाबा चोरमले यांनी सूत्रसंचालन केले.
---