सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मोठ्या विश्रांतीनंतर मागील चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली.तालुक्यात सर्वदूर पाणी-पाणी झाले असून सध्या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दरम्यान भोर - मांढरदेवी मार्गावरील आंबा ता.भोर घाटात वरवडीच्या वळणावर मंगळवार दि.१९ रोजी पहाटे दरड कोसळली. तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने सतर्कता राखीत एक तासाच्या आत रस्त्यावरील राडारोडा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
तालुक्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भोर-मांढरदेवी-वाई मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांनी हुल्लडबाजी न करता जबाबदारीने वाहने चालवावीत.रस्त्याचे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आलेले आहे.आंबाडखिंड घाट डोंगर माथ्यावरून जाणारा आहे.अतिवृष्टीमुळे काहीशा प्रमाणात रस्त्यावर दगड-माती घसरण्याची शक्यता आहे.तर भोर पासून सिमेंट रस्त्याचे काम झालेले रस्त्यावरून वाहने सुसाट चालवली जात आहेत. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी वाहने सावकाश हाकावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता योगेश मेटेकर यांनी केले आहे.