सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज ६ चे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालया मार्फत सुरु आहे. पालखी मार्ग रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये ब्लास्टींगचे काम करणे गरजेचे असल्याने खडक ब्लास्टींगचे काम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये सुरु आहे.
पोलीस यंत्रणेच्या परवानगीनुसार ज्या दिवशी ब्लास्टींग करण्यात येईल त्या दिवशी दिवेघाटातील वाहतूक सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असून दिवेघाटातून (दोन्ही बाजूने) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी पर्यायी वाहतूक मार्गावरून वाहतूक करावी. कात्रज बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. १३१) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. ११९) मार्गे सासवड त्याच प्रमाणे हडपसर-उरळी कांचन शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. ६१) सासवड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन एस एस कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.