सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेतकऱ्याने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर महावितरणकडून ऊस जळालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यास शेतकऱ्याला यश आले. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी कोऱ्हाळे बुद्रुक (ता.बारामती) येथील शेतकरी नानासो आप्पासो माळशिकारे यांचा गट नंबर १९ मध्ये २.५ एकर उसाचे क्षेत्रापैकी वीस गुंठे ऊस व ठिबक संच शेतातून गेलेल्या वीज वाहकतारांच्या घर्षणाने जळाला होता. नानासो माळशिकारे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने गेल्या महिन्यात नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली. सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व बारामतीतील महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले.
ऊस जळीत झाल्यानंतर तलाठी व महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला होता. हंगाम बंद असल्याने सोमेश्वर कारखान्याला ऊस नेता आला नाही.
या घटनेची सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी तातडीने दखल घेत माळशिकारे यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. महावितरणकडे नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसहित प्रस्ताव सोमेश्वर कार्यालयाकडे दाखल केला. त्यानंतर प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या. बारामती व पुणे कार्यालयात त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला. माळशिकारे यांनी नुकसान भरपाई पोटी १ लाख १४ हजार ७०० रुपयाची मागणी केली होती. मात्र पुणे कार्यालयाकडून ८३ हजार ३०० रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. बारामती कार्यालयाने मंजूर रकमेमधून लाईट बिल थकबाकी पोटी १० टक्के रक्कम कपात करून ७४ हजार ८०० रुपये रक्कम मंजूर करून खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती नानासो माळशिकारे यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते महावितरणने दिलेल्या नुकसान भरपाईचे पत्र नानासो माळशिकारे यांना देण्यात आले.
................
ऋषिकेश गायकवाड- संचालक सोमेश्वर कारखाना
महावितणने कमी कालावधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्वरित कागद पत्रांची पूर्तता करावी. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत व नुकसान भरपाई मिळण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार नाही. नुकसान भरपाई दिल्याबद्दल महावितरण कंपनीचे व अधिकाऱ्यांचे आभार. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी ऊस जळीत झाल्यास संपर्क करावा.