सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून वाघळवाडी येथे अत्याधुनिक १०० खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या तसेच वाघळवाडी–सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
उपमुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयास मंजुरी दिली होती आणि अवघ्या आठ महिन्यांत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत वाघळवाडी येथील १० एकर गायरान जागा रुग्णालयासाठी हस्तांतरण करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, कार्यकारी अभियंता अमोल पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी किशोर माने, सरपंच अँड. हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे, अजिंक्य सावंत,सतिश सकुंडे,विजय सावंत यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
रुग्णालयात आधुनिक सुविधा-
वाघळवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामध्ये खालील पुढील सुविधा असणार आहेत :१० बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी),५ सुसज्ज ऑपरेशन थिएटर,आय.सी.यू./एन.आय.सी.यू.,प्रसूती व बालरोग विभाग,एक्स-रे कक्ष, शवागृह, उपहारगृह, औषधालय,८० मुला-मुलींसाठी वसतिगृह, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, बाग व सुशोभिकरण
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र इमारत
वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४३७.२२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येथे पुढील सुविधा असणार आहेत.प्रत्येकी ३ खाटांची महिला व पुरुष वॉर्ड ,वैद्यकीय अधिकारी कक्ष, प्रयोगशाळा, ड्रेसिंग रूम,ऑपरेशन थिएटर, औषधसाठा कक्ष,सोलार पॅनल, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत,फर्निचर व वाहनतळ, १३ नवीन पदांची निर्मिती
अजित पवार यांनी आराखड्यावरील सविस्तर माहिती घेत सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी सांगितले की, “विकासकामे दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करावीत. तसेच परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करण्यात यावे.
गावाला बहुमोल वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल वाघळवाडी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी सरपंच अँड. हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे, गणेश जाधव, जितेंद्र सकुंडे, अनिल शिंदे, प्रभाकर कांबळे, विशाल हंगिरे आदींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
वाघळवाडी-सोमेश्वरनगर ग्रामपंचायतीअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा आढावा देणाऱ्या ‘विकासनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
वाघळवाडी हे बारामती शहरापासून ४० किमी अंतरावर असल्याने या रुग्णालयामुळे तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील नागरिकांना जलद, दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे रुग्णालय शैक्षणिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे.
या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार, स्तनदा माता, लहान बालकांचे लसीकरण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना थेट आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत.