सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
शिरवळ या ठिकाणी वराहासाठी खाद्य गोळा करणाऱ्या युवकाचे अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबतची माहिती कळताच शिरवळ पोलिसांना अवघ्या सात तासात पाच अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या व्यक्तीने दुचाकी चोरल्याच्या संशयातून हे अपहरण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शिरवळमध्ये साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर शनिवारी दि.20 रोजी संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये भरत लक्ष्मण वाघमारे (वय-36वर्षे, मूळ रा.माळेगाव,नसरापूर ता.भोर, सध्या रा.पळशी, ता.खंडाळा) हे त्यांच्या तीनचाकी टेम्पोतून वराहासाठी वेस्टेज खाद्य आणण्यासाठी गेले होते. दरम्यान एका लाल दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी वाघमारे यांचे वाहन थांबवून त्यांना एका चारचाकी वाहनात जबरदस्ती बसवून त्यांचे अपहरण केले.
या घटनेची माहिती कळताच सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना या घटनेचा छडा लावण्याच्या सूचना केल्या. यावर शिरवळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे गतिमान करत तीन पथके तयार केली. यादरम्यान तपास करत असताना अपहरण करणाऱ्या आरोपीचा भाऊ नारायणगाव ता.जुन्नर या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नलवडे यांचे पथक तात्काळ रवाना झाले. नारायणगाव येथे आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले असता अपहरणात वापरलेल्या वाहनाचा चालक मुळशीमध्ये एका डोंगराळ भागात असल्याचे समजले. यावर त्या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता अपहरण झालेले भरत वाघमारे हे अपहरणात वापरलेल्या वाहनासह पोलिसांना सापडले. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संशयीतांना शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
यामध्ये नंदकुमार चंद्रकांत शिंगटे/जाधव (वय 42वर्षे) , प्रतीक चंद्रकांत शिंगटे (वय 26वर्षे, दोघे रा.खडकी,ता.वाई), गणेश शिवाजी पाचंगणे (वय 27, रा.सारोळा, ता.जामखेड), युवराज जालिंदर गायकवाड (वय 52, रा.राजुरी,ता.जामखेड), रमेश परसराम बहिर (वय36 रा.नाव्हली, ता.जामखेड) अशी शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नावे आहेत.
साधारणपणे चार वर्षांपूर्वी भरत वाघमारे याने नंदकुमार शिंगटे यांची दुचाकी चोरी केल्याचा संशयावरून ते पैसे वसूल करण्यासाठी भरत वाघमारे यांचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या कारवाईमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व कीर्ती म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, पोलीस अंमलदार सचिन वीर, नितीन नलवडे, प्रशांत धुमाळ, मनीषा बोडके, अरविंद बाऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे, मंगेश मोझर, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, दीपक पालेपवाड, अक्षय नेवसे, सोनाली जाधव यांच्याद्वारे करण्यात आली.