सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकत्याच घडलेल्या अपघातात आस्कवडी येथील तुषार बाळू दसवडकर यांच्या आईला गंभीर दुखापत होऊन त्या कोमामध्ये गेल्या आहेत. या घटनेप्रकरणी दसवडकर यांनी वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज सादर करून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि. ११ सप्टेंबर २५ रोजी तुषार दसवडकर यांचे भाऊ आणि आई साखर मार्गे आस्कवडी येथे येत असताना मार्गासनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गाडी रस्त्यावरील खोल खड्ड्यात आपटली. यातून गाडी अनियंत्रित होऊन खाली पडली आणि अपघात झाला. या अपघातात तुषार यांच्या आई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील धायरी रुग्णालयात अतितातडीने उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्या कोमामध्ये गेल्याचे सांगितले जाते.
या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांवर असल्याचा ठपका तक्रारदाराने ठेवला आहे. ढिसाळ नियोजन, सुस्तावलेली कार्यपद्धती आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील खड्डे कायम आहेत; तरीही विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही, असेही अर्जात नमूद केले आहे.
याच मार्गावर, केवळ दोन महिन्यांपूर्वी मार्गासनी येथेच एका तरुणाचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता व आस्कवडी येथे खड्ड्यांमुळे ट्रक पलटी झाला होता. या रस्त्यासाठी स्थानिकांनी तसेच मनसेने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जनआंदोलन ही उभारले होते, मात्र प्रशासन व सार्वजनिक विभागाकडून कोणतीही गंभीर दखल घेतली गेली नाही. परिणामी अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे.
अजून एखादा जीव गेल्यानंतरच रस्ता व्यवस्थित होणार आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.