राजगड l रस्त्यांच्या निधीसाठी मनसे करणार गावोगावी 'भीक मागो' आंदोलन : रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांचा पवित्रा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस भीषण होत असून प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या निधीसाठी मनसेने गावोगावी 'भीक मागो आंदोलन' करण्याचा अनोखा पवित्रा जाहीर केला आहे. या आंदोलनाची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली.
         दसवडकर म्हणाले की, "तालुक्यातील रस्त्यांवर दररोज अपघात होत आहेत. या अपघातांतून अनेक नागरिकांचे जीव जात आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व येत आहे. विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक आणि सामान्य प्रवासी यांना रोजच्या प्रवासात खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. आमदार, खासदार किंवा पालकमंत्री यांच्याकडून तात्काळ निधीची उपलब्धता होत नाही. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत प्रशासनाने रस्ते दुरुस्त केले नाहीत, तर मनसे तालुक्यातील प्रत्येक गावात भीक मागून पैसे गोळा करेल."
         हे आंदोलन राजगड (वेल्हे) तालुक्यातील प्रत्येक गावात होणार असून, लोकांकडून एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या स्वरूपात मदत गोळा करण्यात येणार आहे. हा निधी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सुपूर्द करून "हा पैसा रस्त्यांसाठी वापरा" अशी मागणी करण्यात येणार आहे. मनसेने यापूर्वीही ३१ ऑगस्ट २०२५ रोजी चेलाडी फाटा ते राजगड या मार्गावर 'खड्डा येथे झाड' लावून आंदोलन केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तात्पुरती खड्डे बुजवण्याची उपाययोजना केली होती. मात्र ती कुचकामी ठरल्याचे पुन्हा दिसत आहे.
         मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, प्रशासनावर रस्ते दुरुस्त करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
To Top