सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
तरडगाव (ता. फलटण) : सासवड-तरडगाव डांबरी रस्त्यालगत मदनेवस्ती येथे पारधी समाजातील नागेश रमेश भोसले (वय 26) व त्याच्या कुटुंबीयांवर लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी (दि.13 सप्टेंबर) सायं. साडेसहाच्या सुमारास घडली असून लोणंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
फिर्यादी नागेश भोसले याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ दत्तात्रय चव्हाण (दोन्ही रा. मदनेवस्ती, तरडगाव, ) व एक विधी संघर्ष बालक यांनी फिर्यादीने "गाडी हळू चालवा" असे म्हणाल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यात अविनाश रमेश भोसले, पप्पु रमेश भोसले, गायत्री पप्पु भोसले व दिव्या अविनाश भोसले जखमी झाले आहेत. तसेच शिवीगाळ, दमदाटी करत जीव घेण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोघे चव्हाण बंधू यांना अटक करण्यात आली असून विधीसंघर्ष बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सावंत (दहिवडी, अतिरिक्त चार्ज फलटण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोसले (लोणंद पोलीस स्टेशन) करीत आहेत.
