सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर-कापूरव्होळ मार्गावरील सांगवी हि.मा.येथे भोर बाजार समितीचे मा.सभापती अंकुश पांडुरंग खंडाळे यांच्या ( एमएच- १२ जेएम-५७००) या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार सचिन शिवाजी जांभुळकर (वय-४० रा. येवली ) तर दुचाकीवरील धनश्री शशिकांत जांभुळकर ( वय- ११) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.याची फिर्याद सचिन जांभुळकर यांनी भोर पोलिसात दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवार दि.२ येवली ता.भोर येथील घरातून सचिन जांभुळकर व त्यांची पुतणी धनश्री जांभुळकर दुचाकीवरून हारतळी ता. खंडाळा येथे जाण्यास निघाले होते. ते सांगवी हि.मा. येथे आले असता समोरून येणाऱ्या (एमएच १२ जेएम ५७०० )या खंडाळे यांच्या कारने जिवे मारण्याच्या उद्देशाने जांभुळकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात फिर्यादी तसेच पुतणी गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.दरम्यान खंडाळे व सचिन जांभुळकर यांनी एकमेकांविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये फिर्याद दिली होती.त्याचा राग मनात धरून खंडाळे यांनी अंगावर गाडी घालून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा उलट सुलट चर्चा तालुक्यात सुरू आहेत.भोर पोलिसांनी खंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, हवालदार वर्षा भोसले तपास करीत आहेत.