सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : प्रतिनिधी
राजगड तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. भात पोसण्याच्या अवस्थेत असतानाच रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता, त्यातच अवकाळी पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड तालुक्यात भात हेच शेतकऱ्यांचे प्रमुख पिक आहे. मात्र सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उभे पिक कोसळले, तर काही ठिकाणी कापलेला भात पाण्यात भिजून सडला. त्यामुळे विक्रीयोग्य भाताचे प्रमाण घटले असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी कापणीस थांबले असून पुढील दिवसांत अजून पाऊस झाल्यास नुकसान वाढण्याची भीती आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या सावध भूमिकेत आहेत आणि कापणीचे काम थांबवले आहे.
