सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून सुपे पोलीस स्टेशनच्यावतीने मॅरेथॉन ( रन फॉर युनिट ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुपे येथील एमएसईबी चौक ते शेरेचीवाडी या पाच किलोमीटर अंतरात ही स्पर्धा घेण्यात आली. येथील सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी नियम व अटी सांगून तसेच निशानी फडकावून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
या मॅरेथॉनच्या ( रन फॉर युनिट ) निमित्ताने सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, पोलीस पाटील, पत्रकार, सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी मॅरेथॉन मधील सर्व स्पर्धकांना पोलीस स्टेशन कडून पाणी बॉटल, ORS तसेच केळी व उल्पपोहार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये पुरुष गटात विटेश्वर शिरसाठ याने प्रथम क्रमांक पटकवला. तर द्वितीय क्रमांक यश भापकर आणि तृतीय क्रमांक पृथ्वीराज शिवणे यांनी मिळवला. तसेच महिला गटात सविता खडके हिने प्रथम क्रमांक पटकवला. तर द्वितीय क्रमांक नंदिनी दहे व तृतीय क्रमांक प्राची गायकवाड हिने मिळवला. या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आलेले आहे.
........................................
