बारामती l महिन्याभरात ऊस जळीतच्या दोन घटना...! लाखो रुपयांचे नुकसान : महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का ?

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 वाणेवाडी येथील सौरभ महेंद्र भोसले या शेतकऱ्याचा पाऊण एकर ऊस शेतातून गेलेल्या महावितरण वीज कंपनीच्या वीज वाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्यामुळे जळीत झाला. ऊस जळीत झाल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. 
         २८ ऑगस्ट रोजी सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी सोमेश्वर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाचे प्रमुख अजित आंबोरे यांना वीज कंपनीचे रोहित्र,विजेच्या तारा, खांबावरील जोड या मधे वारंवार बिघड होऊन शेतकऱ्यांची पिके जळीत होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत आहे यावर त्वरित उपाययोजना कराव्यात याचे निवेदन सोमेश्वर परिसरातील आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन दिले होते.
       उपविभागीय कार्यालयाने कोणतीही दखल न घेतल्याने आज वानेवाडीतील शेतकऱ्याला लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 
सोमेश्वर परिसरातील ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे या अगोदर चोपडज गावातील दिलीप रामचंद्र गाडेकर या शेतकऱ्याचा एक एकर उजळीत झाला होता यात शेतकऱ्याच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. 
         कारखाने सुरू झाले नसल्याकारणाने ऊसाची विल्हेवाट लावण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांवरती ओढवते आहे.
       शेतकऱ्याच्या नुकसानीला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आहे.
महिन्याभरात दोन घटना घडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर ही  उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाग येईल का नाही अशी चर्चा सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.
-------------------
सर्व सभासद शेतकरी मिळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहोत. महावितरणच्या गलतान कारभारामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे आम्ही परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी अर्ज देऊन सुद्धा महावितरण उपविभागीय कार्यालयाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

ऋषिकेश गायकवाड 
(संचालक, सोमेश्वर कारखाना)
To Top