Phaltan Breaking l धुमाळवाडी दरोडा प्रकरणातील मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
धुमाळवाडी येथे पर्यटकांवर झालेल्या दरोड्याप्रकरणी आणि मोक्क्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीस अखेर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रणजित कैलास भंडलकर (रा. खामगाव, ता. फलटण) या सराईत गुन्हेगाराची अटक पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. मागील चार वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता.
          दि. ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास धुमाळवाडी (ता. फलटण) येथील प्रसिद्ध धबधबा पाहून पर्यटक आपापल्या गावी निघाले होते. त्याचवेळी वारुगड टेकडीवरून टेहाळणी करणाऱ्या दहा इसमांनी महिला पर्यटकांना हेरून धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर त्यांना गाठले. लाकडी दांडकी व लोखंडी सु-याचा धाक दाखवत त्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने, पुरुषांकडील घड्याळे व रोकड असा एकूण ५४,५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१०/२०२५, भा.दं.वि. कलम ३९७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सोमेश्वर जायपत्रे यांच्याकडे आहे.
          या गुन्ह्यातील आरोपी रणजित कैलास भंडलकर व त्याचा साथीदार तानाजी नाथाबा लोखंडे (दोघे रा. खामगाव) हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. रणजित भंडलकर हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, गर्दी मारामारी, दुखापत व महिला अत्याचार असे तब्बल आठ गंभीर गुन्हे नोंद आहेत. फलटण तालुक्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला होता. तो मागील चार वर्षांपासून फरार होता
             स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी फरारी आरोपींचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांनी विशेष मोहिम राबवली.
या मोहिमेदरम्यान ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रणजित भंडलकर व त्याचा साथीदार सांगवी (ता. फलटण) येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून स.पो.नि. शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पो.उ.नि. बदने, तसेच पोलीस अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हणमंत दडस, कल्पेश काशिद, तानाजी ढोले, गणेश ठोंबरे व अक्षय खाडे यांनी सांगवी येथे सापळा लावला. त्यावेळी दोघेही तेथे आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
          या यशस्वी कारवाईमुळे धुमाळवाडी दरोडा प्रकरणासह मोक्क्याचा फरारी आरोपी जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

To Top