Baramati Breaking l सुप्यातील भुईकोट किल्ल्याच्या जागेवर अतिक्रमण...! एक एकर जागेत कंपाऊंड टाकून नांगरट केली...पाण्याचे बोअर ही घेतले : सुपे ग्रामस्थ आक्रमक : कडकडीत बंद ठेवून केला निषेध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामतीत तालुक्यातील सुपे गावची ऐतिहासिक परगणा अशी ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या जागेत अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांनी शनिवारी ( दि. ८ ) स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद ठेवुन निषेध सभा घेण्यात आली. 
         सुपे येथील आझाद मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ग्रामस्थांच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी सुपे परगण्यातील बहुतांश ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 
       मागिल आठवड्यात भुईकोट किल्ल्याच्या जागेवर तारेचे कंपाउंड टाकून एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. या जागेत एक बोअरवेल घेवुन या जागेत नांगर फिरविण्यात आला आहे. या अतिक्रमनाच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवारी ( दि. ६ ) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अतिक्रमण करण्यात आल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी चर्चा केली.
     त्यानंतर आज ( शनिवारी ) ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपआपली दुकाने कडकडीत बंद ठेवुन निषेध नोंदवाला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून ऐतिहासिक परागणा असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या जागेवर अतिक्रमण होणे दुर्भाग्य आहे. याची शासनस्तरावर सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच या जागेतील अतिक्रमण शासनाने त्वरीत काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहितेमामांना सुद्धा चुकीमूळे शिक्षा दिली होती. त्याचप्रमाणे पद्धतीने शासनाने या जागेतील अतिक्रमण काढून सुपे परगण्याला न्याय द्यावा अशी भूमिका काहीनी मांडली. येथील आंदोलनाबाबत तरुण वर्ग सद्या तरी सौम्य भूमिका घेत आहे. मात्र शासनाने याची दाखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.. 
       या जागेवर बोगस कागदपत्राच्या आधारे नोंदी लावून काही जणांनी अतिक्रमण केल्याने भुईकोट किल्ल्याची वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत समक्ष भेटून ग्रामस्थांनी यातून मार्ग काढण्याची मागणी केली. या जागेतील अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे अशी प्रतिक्रिया काही व्यक्तींनी दिली. 
        यासंदर्भात स्थानिकामार्फत नुकतीच ही खरेदी घेतलेल्या मालकामार्फत मलिदा मागितला व घेतल्याची चर्चा ग्रामस्थामार्फत केली जात आहे. 
             दरम्यान या किल्ल्याच्या जागेबाबतची बहुतांश कागदपत्रे तहसीलदारांकडे सुपूर्त केली आहेत. तसेच काही कागदपत्रे पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयात सादर करून या जागेवर ग्रामपंचायत लवकरच दावा दाखल करणार आहे. तसेच ही जागा सुप्यातील नियोजित प्रारूप विकास आराखड्यात आरक्षित असल्याची माहिती येथील सरपंच तुषार हिरवे यांनी दिली. 
         येथील ऐतिहासिक परगण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. येथील वास्तू आबाधित राहवी यासाठी शासनाने भुईकोट किल्ल्याच्या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सुपे प्ररगणा प्रमुख सुनील राजे भोसले यांनी केली. 
          ..........................................
To Top