सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कोण-कोण येतील..प्रलोभने दाखवतील..तात्पुरता विचार करू नका..कोणाच्याही आमिषाला बळी न पडता पाच वर्षांच्या विकासाचा विचार करा. मागच्या काळात विरोधकांकडून जो अधिक जोमाने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही.भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवारने दोन नंबरचे उमेदवार दिलेले नाहीत.पालकमंत्री,आमदार आणि आता होणारा भोरचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार असल्याने त्रिवेणी संगम जुळून आला आहे.भोरच्या विकासासाठी एकदा संधी द्या, संधीचे सोने करतो असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
भोर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री पवार रविवार दि.३० बोलत होते.आमदार मांडेकर बोलताना म्हणाले विरोधी पक्षात आर्थिक पाटबळ असणारे व दहशत करणारे उमेदवार आहेत.दादांनी तळागाळातील हाडाच्या तसेच सर्वसामान्य जनतेत जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नगरपरिषदेवर उमेदवारी दिली आहे.शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवणारे व्यक्तिमत्व अजित पवार असल्याने सर्वांगीण विकास साधण्यासाठी भोर वासियांनो साथ द्या.भोरला बारामती करून दाखवायचे आहे.यावेळी स्टार प्रचारक महेश शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले,आमदार शंकर मांडेकर,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,सुनील चांदेरे,भालचंद्र जगताप,चंद्रकांत बाठे,भगवान पासलकर,विक्रम खुटवड,उमेदवार रामचंद्र आवारे उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले भोर तालुक्याच्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्राची व राज्याची मदत ताकतीने उभी करू.भोर नगरपरिषदेसाठी सर्व समाजला संधी देऊन उमेदवार दिलेले आहेत.भोरकरांनो विधानसभेच्या वेळी ज्याप्रमाणे मदत केली त्याप्रमाणेच नगरपालिकेसाठी मदत करा पुढचे पाच वर्ष विकास करण्याची जबाबदारी माझी राहील असा विश्वास देतो.
