सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवणारी खळबळ उडाली असून मागील पंचवार्षिकला अध्यक्षा राहिलेल्या निर्मला आवारे तसेच काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले रामचंद्र (नाना) आवारे यांनी शनिवार दि.८ अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.दरम्यान नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याचे चिन्ह आहे.
नाना आवारे भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक होते.मात्र नाना आवारे यांनी अचानक निर्णय घेऊन पक्ष बदल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.आवारे यांच्या प्रवेशामुळे भोर तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.त्यामध्ये आवारे यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते.परंतु त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेतल्याने सर्वच राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.भाजपच्या गोटात या घडामोडीमुळे मोठी खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र या प्रवेशामुळे नवीन ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.आगामी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आवारे यांचा हा निर्णय भोर तालुक्याच्या राजकीय गणितावर कितपत परिणाम करतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.रामचंद्र आवारे यांच्या समवेत गजानन शेटे, ऋषभ आवारे,अमित जाधव,बाळा शेटे,चेतन उल्हाळकर , स्वप्निल तारू संतोष बारटक्के आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे ,भालचंद्र जगताप,विक्रम खुटवड,गटनेते यशवंत डाळ, चंद्रकांत बाठे,शहराध्यक्ष संदीप शेटे,कार्याध्यक्ष अतुल काकडे,माजी शहराध्यक्ष केदार देशपांडे उपस्थित होते.
