राजगड l कोंढावळे खुर्दमध्ये अंत्ययात्रेसाठी रस्ता नाही..! स्मशानभूमी नाही..अंत्यविधीही उघड्यावर : अनेक वर्षांची मागणी असूनही रस्त्याचा प्रश्न कायम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड, राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द गाव अजूनही मूलभूत पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर नदी काठावर असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजतागायत पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग झाडी-झुडपांनी व्यापलेला, चिखलमय व वाढलेल्या गवताने भरलेला असल्याने अंत्ययात्रा नेणे अत्यंत कठीण होते. कधी कधी मृतदेह झाडीतून, चिखलातून मार्ग काढत नेण्याची वेळ येते, तर काही वेळा लांबचा फेरा मारावा लागतो. काल (३० नोव्हेंबर) कोंढावळे खुर्द येथील सावित्री खोपडे यांचे निधन झाले. मात्र स्मशानभूमीकडे थेट रस्ता नसल्याने त्यांचा मृतदेह चक्क ट्रॅक्टरमधून लांबचा वळसा घालून न्यावा लागला. या घटनेमुळे ग्रामस्थांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. 
-------------
"गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ठराव मंजूर करून लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही."
 ईश्वर खोपडे (ग्रामस्थ, कोंढावळे खु.) 
 ---------------      
दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणारा काही भाग खाजगी क्षेत्रातून जात असल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या अडचणींवर तोडगा काढून तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सन्मानाने अंत्यविधी करता यावा यासाठी किमान रस्त्याची सुविधा तरी द्यावी, अशी आर्त हाक सध्या कोंढावळे खुर्दमधून प्रशासनाकडे केली जात आहे.
To Top